गोल्डन नेस्ट ते हटकेश
पूर्णपणे नव्याने वसलेला परिसर म्हणजे गोल्डन नेस्ट ते हटकेश हा भाग. भाईंदर, नवघर आणि गोडदेव गावात राहणारे भूमिपुत्र एकेकाळी या परिसरात शेती करत असत. भाईंदर ते काशिमीरा या मुख्य रस्त्यावरून जाताना डाव्या अंगाला येणारा मीरा रोडचाच हा एक भाग. शिवार येथील तलाव सोडला तर रहिवाशांचा कोणताही मागमूस या ठिकाणी नसे. कालांतराने शेती कमी होत गेली मात्र ओस पडलेल्या जमिनींना सोन्याचे भाव येऊ लागले. शांतीनगर, शीतल नगर आणि नया नगर विकसित होऊ लागल्यानंतर विकासकांची नजर या भागावर पडली आणि गेल्या काही वर्षांत या ठिकाणी झपाटय़ाने इमारती उभ्या राहू लागल्या.
या परिसरात मोकळ्या जमिनीच असल्याने भाईंदरसारख्या एक-दोन इमारती न उभ्या करता विकासकांनी मोठाले आराखडे मंजूर करवून घेतले. त्यामुळे या भागात गोल्डन नेस्ट, इंद्रलोक, बेवर्ली पार्क, जांगीड अशा बहुमजली इमारतींची संकुले उभी राहिली आहेत. नव्याने विकसित होत असलेल्या या भागात भाईंदरमधून राहायला जाणाऱ्यांची संख्या फार थोडी असून बहुतांश नागरिक हे मुंबई आणि आसपासच्या ठिकाणाहून या ठिकाणी राहायला आले आहेत.
इथला बहुतांश परिसर मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर विकसित झाला असल्याने उभ्या राहिलेल्या इमारती कोणतीही दाटीवाटी न करता, इमारतीच्या आसपास मोकळी जागा, वाहने उभी करण्यासाठी जागा अशा पद्धतीने बांधल्या गेल्या आहेत. मध्यम आणि उच्च मध्यम स्तरातील आणि सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात.
महानगरपालिकेच्या गेल्या निवडणुकीत एवढय़ा मोठय़ा परिसरासाठी केवळ एकच प्रभाग असल्याने दोन सदस्यांचा एकच प्रभाग होता आणि दोन्ही सदस्य भाजपचेच निवडून आले होते. त्याआधीच्या निवडणुकीत या ठिकाणची एकमेव जागा काँग्रेसकडे होती. गेल्या दहा-बारा वर्षांत या परिसरातील लोकसंख्या झपाटय़ाने वाढली असल्याने आता या भागासाठी नव्या प्रभाग रचनेत तीन प्रभाग झाले असून तब्बल बारा नगरसेवक या ठिकाणाहून महापालिकेत निवडून जाणार आहेत. इथल्या तीन प्रभागांना घोडबंदर गाव आणि महामार्ग परिसराचा काही भाग जोडला गेला आहे.
शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांच्या ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्रात हा परिसर येत असल्याने शिवसेनादेखील बारा जागा ताब्यात घेण्यासाठी ताकद लावत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मर्यादित आहे. या ठिकाणचे मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सक्रिय असल्याने जिंकून येण्याची त्यांनाही आशा आहे.
नव्याने विकसित होत असल्याने आजही काही भागांतील रस्त्यांची दुरवस्था आहे. सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असले तरी ते अर्धवट स्थितीतच पडले आहेत.
या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना भाईंदर आणि मीरा रोड ही दोन्ही रेल्वे स्थानके दूर असल्याने त्यांना परिवहन सेवेच्या बस अथवा रिक्षांवर अवलंबून राहावे लागते. परंतु परिवहन सेवा पुरेशी नसल्याने दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा भरुदड बसतो. गेल्या सहा-सात वर्षांपासून महानगरपालिकेने नव्या इमारतींना नळ जोडणी देणे बंद ठेवले होते. त्यामुळे या कालावधीत उभ्या राहिलेल्या इमारतींमधील रहिवाशांना टँकरच्या पाण्यावर दिवस काढावे लागत होते. मात्र महापालिकेने नुकतेच नळजोडणी देणे पुन्हा सुरू केल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
- या परिसरात १२, १३ आणि १८ हे तीन प्रभाग येतात.
- एकूण मतदार – ६३५८७
- पुरुष मतदार – ३४४६४
- स्त्री मतदार – २९१२२
निवडणुकीसाठी राजकीय पक्ष मेट्रो, सीसीटीव्ही, वायफाय सिटी अशा अत्याधुनिक सोयीसुविधा देण्याच्या घोषणा करत आहेत. परंतु प्राथमिक सोयीसुविधांबाबत मात्र कोणीच बोलत नाही. खड्डेमुक्त रस्ते, स्वच्छता, आरोग्य व्यवस्था या सुविधांकडे लक्ष देणारे नगरसेवक निवडून येणे गरजेचे आहे. –
–काजल गोलानी
निवडून येणारा लोकप्रतिनिधी स्वच्छ प्रतिमेचा असावा, त्याला प्रभागातील समस्यांची चांगली जाणीव असावी, शिवाय तो स्थानिक असावा. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींशी नंतर संपर्क करणेही कठीण होत असते त्यामुळे लोकप्रतिनिधी २४ तास किमान मोबाइलवर उपलब्ध असावा
– जमील शेख