कल्याण : कल्याण मधील वालधुनी उड्डाण पूल भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या रस्ते कामामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवासी हैराण आहेत. सकाळच्या वेळेत कल्याण रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या आणि संध्याकाळी कामावरून परतणाऱ्या प्रवाशांचे यामध्ये सर्वाधिक हाल होत आहेत.
कल्याण शहर पूर्व आणि पश्चिम, उल्हासनगर, विठ्ठलवाडी जोडणारा हा रस्ता आहे. या रस्त्यावरून एका वेळी अवजड, बस, रिक्षा, मोटार, दुचाकी अशी वाहने धावतात. शाळेच्या बसचा हाच मार्ग आहे. म्हारळ, वरप, कांबा भागातील बहुतांशी बस याच रस्त्यावरून येजा करतात. कल्याण पूर्व, पश्चिम भागात होणारी वाहतूक याच रस्त्याने होते. त्यामुळे सकाळ, संध्याकाळ या रस्त्यावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी होते.
हेही वाचा…टिटवाळ्याजवळ लोकलवर भिरकावलेल्या दगडीत दोन प्रवासी जखमी
कल्याण वाहतूक विभागाचे पोलीस, वाहतूक सेवक या भागात तैनात असतात. परंतु, या भागातील अरूंद रस्ते, दुचाकी स्वारांची घाई आणि अंतर्गत गल्लीबोळ कोंडीने भरले जात असल्याने वाहतूक पोलिसांची कोंडी सोडविताना हैराणी होत आहे.आता परीक्षांचा हंगाम सुरू आहे. या कोंडीमुळे विद्यार्थ्यांचे सर्वाधिक हाल होत आहेत. या भागातील रस्ते काम ठेकेदाराने लवकर पूर्ण करावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.