ठाणे : शहरात सुरू असलेली रस्ते कामे दर्जाहिन होऊ नयेत यासाठी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर हे आग्रही असतानाच, दुसरीकडे कोपरीत रस्त्याचे काम निकृष्ट केल्याप्रकरणी काळ्या यादीत टाकलेल्या एआयसी या कंपनीला रस्त्यांची कामे देण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. शहरातील एकूण ३४ रस्त्यांच्या कामासाठी ठेकेदाराला ७२ कोटींचे कंत्राट देण्यात आले असून याप्रकरणी भाजपने चौकशीची मागणी केल्याने पालिका अधिकारी आणि ठेकेदार चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, ठाणे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी हे आरोप फेटाळून लावत संबंधित कंपनीला नव्याने कोणतेही काम देण्यात आलेले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ हे अभियान ठाणे महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. यामध्ये रस्ते, सुशोभिकरण तसेच इतर प्रकल्पांची कामे सुरु आहेत. यातील रस्ते कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून ६०५ कोटी रुपयांचा निधी दिला असून या निधीतून शहरातील २८४ रस्त्यांच्या नुतनीकरणाची कामे सुरू आहेत. ठाणेकरांना चांगले, दर्जेदार रस्ते उपलब्ध व्हावेत आणि ठाणेकरांचा खड्डेमुक्त प्रवास व्हावा या उद्देशातून रस्त्यांच्या नुतनीकरणाची कामे करण्यात येत आहेत. परंतु अनेक रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याच्या तक्रारी पुढे येत असून या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मुंबई आयआयटीच्या पथकामार्फत रस्त्यांच्या कामाचे परिक्षण सुरू केले आहे. एकीकडे रस्ते कामे दर्जाहिन होऊ नयेत यासाठी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर हे आग्रही असतानाच, दुसरीकडे कोपरीत रस्त्याचे काम निकृष्ट केल्याप्रकरणी काळ्या यादीत टाकलेल्या एआयसी या कंपनीला रस्त्यांची कामे देण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

कोपरी रेल्वे स्थानकाजवळील सर्वाधिक वर्दळीचा परिसर असलेल्या अष्टविनायक चौकातील मुळ रस्ता आणि त्याची केलेली दुरुस्ती ही दोन्ही कामे निकृष्ट दर्जाची झाल्याची बाब तीन महिन्यांपुर्वी उघडकीस आली होती. या प्रकरणी एआयसी या कंपनीला तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्याचे आणि या काळात ठाणे महापालिकेच्या इतर कोणत्याही निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यास प्रतिबंध घालण्याचे आदेश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले होते. हि कारवाई होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटत नाही, तोच एआयसी या कंपनीला रस्ते नुतनीकरणाची कामे देण्यात आली आहेत. एक ते दोन नव्हे तर चक्क ३४ रस्त्यांची कामे कंपनीला देण्यात आली असून या कामांचे एकूण कंत्राट ७१ कोटी ९४ लाख ८६१ रुपयांचे आहे. या कंपनीमार्फत डांबरी आणि मास्टीक पद्धतीने रस्ते तयार करण्याची कामे सुरू आहेत. या सर्व कामांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काळ्या यादीत टाकलेल्या ठेकेदाराला पुन्हा काम देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत असून यामुळे पालिकेच्या संबंधित विभाग अडचणीत येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याप्रकरणी एआयसी या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात आली होती. तरीही या कंपनीला ७२ कोटींची रस्त्यांची कामे पुन्हा देण्यात आली आहेत. काळ्या यादीत असतानाही या कंपनीला पुन्हा कामे कशी देण्यात आली आणि या कंपनीला कोणाचा वरदहस्त आहे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. ठाणे महापालिका आयुक्तांनी कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचे काम केले होते. परंतु त्याच कंपनीला पुन्हा काम देण्यात आल्याने आयुक्तांच्या भुमिकेवरच संशय निर्माण झाला आहे. या कंपनीचे काम तातडीने थांबवावे आणि त्यांनी केलेल्या कामांची तपासणी करावी. याप्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यात यावी.

-मृणाल पेंडसे माजी नगरसेविका, भाजपा

पहिल्या टप्प्यात २१४ कोटींच्या निधीतून सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये एआयसी या कंपनीला काही रस्त्यांची कामे दिली होती. त्यापैकी कोपरीतील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याप्रकरणी कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले. या कारवाईविरोधात कंपनीने न्यायालयात धाव घेतली आहे. दुसऱ्या टप्प्यात ३९१ कोटींची कामे करण्यात येत असून यामध्ये एआयसी या कंपनीला नव्याने कोणतेही कामे देण्यात आलेले नाही.

-प्रशांत सोनाग्रा शहर अभियंता, ठाणे महापालिका

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Road works to blacklisted contractor in thane bjp demands inquiry ysh