डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसी निवासी, औद्योगिक विभागातील काँक्रीट रस्त्यांची कामे अतिशय संथगतीने सुरू आहेत. ज्या ठिकाणी काँक्रीटची कामे सुरू आहेत. तेथे रस्ता काँक्रीटीकरणानंतर दोन ते तीन दिवस पाणी मारले जात नाही. रस्ता खोदून ठेवल्यानंतर तेथे दोन महिने कोणतेही काम केले जात नाही. रस्त्याखालील जलवाहिन्या सतत ठेकेदाराच्या कामगारांकडून फोडण्यात येत आहेत. त्यामुळे रस्ते नको, आता तुमची काँक्रीट रस्त्याची कामे झटपट आवरा, अशा संतप्त प्रतिक्रिया डोंबिवली एमआयडीसीतील रहिवाशांकडून देण्यात येत आहेत.
एमआयडीसीत घाईघाईने करण्यात येत असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या कामांचा दर्जा सुमार आहे. रस्ता काँक्रीटीकरण केल्यानंतर त्याच्यावर सलग १५ दिवस पाणी मुरेल अशा पध्दतीने पाण्याचा दिवसातून तीन ते चार वेळा मारा केला पाहिजे. या भागात रस्ते केल्यानंतर तीन दिवस रस्त्यांवरील खाच्यांमध्ये पाणी टाकले जात नाही. त्यामुळे कडक उन्हामुळे नवीन कोऱ्या रस्त्यांना तडे पडण्यास सुरुवात झाली आहे, असे एमआयडीसीतील रहिवाशांनी सांगितले.
कोट्यवधी रुपये खर्च करुन काँक्रीट रस्त्याची कामे एमआयडीसीत ४० वर्षानंतर करण्यात येत आहेत. ही कामे दर्जेदार व्हावीत अशी इच्छा असताना या कामांचा सुमार दर्जा पाहून रहिवाशी, या भागात बांधकाम विभागात काम करणारे नोकरदार वर्ग एमआयडीसीतील रस्ते बांधणीचा प्रकार पाहून हैराण आहेत. ठेकेदार ही कामे करत असला तरी त्याला भक्कम राजकीय आशीर्वाद असल्याने या कामाच्या नागरिकांनी तक्रारी करुनही त्याची दखल घेतली जात नाही. कामाच्या रहिवाशांच्या सूचना ऐकून घेईल. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देईल असा एकही अधिकारी, पर्यवेक्षक कामाच्या ठिकाणी नसतो, असे रहिवाशांनी सांगितले. रस्त्यांवर पाणी मारण्यात येत नसल्याने काँक्रीट सुकून पांढरे शुभ्र पडले आहे.
हेही वाचा >>> मुख्यमंत्र्यांच्या शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणखी एक उड्डाणपूल
रस्ते कामे करताना जेबीसी चालक धेडगुजरीपणाने रस्ते उखळणी करत असल्याने आतापर्यंत २० हून अधिक वेळा एमआयडीसीतील घरांमध्ये गेलेल्या जलवाहिन्या फुटल्या आहेत. त्याचा फटका रहिवाशांना पाणी टंचाईच्या माध्यमातून बसत आहे. अनेक रहिवाशांच्या इमारती, बंगल्याच्या आवारात असलेल्या मोटारी रस्ते खोदल्याने बाहेर काढता येत नाही. खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी अथक मेहनत घेऊन डोंबिवली एमआयडीसीतील निवासी, औद्योगिक विभागासाठी शासनाकडून ११० कोटीचा निधी रस्ते कामासाठी मंजूर करुन आणला आहे.
या मजबूत रस्त्यांसाठी खा. शिंदे यांनी पुढाकार घेऊन ठेकेदाराला योग्य त्या सूचना द्याव्यात. अन्यथा, बेवारस पध्दतीने बांधण्यात आलेल्या या रस्त्यांकडे एमआयडीसी, पालिका, एमएमआरडीए नियंत्रक अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाहीतर निकृष्ट कामांची रस्ते बांधणी या भागात होईल, अशी भीती रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे. अधिक माहितीसाठी एमआयडीसी अधिकारी, ठेकेदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. स्थानिक आ. प्रमोद पाटील यांना संपर्क केला की त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने न्याय मागायचा कोणाकडे असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.