डोंबिवली – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत ‘मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणा’च्या (एम.एम.आर.डी.ए.) ३७५ कोटींच्या निधीतून सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. या रस्त्यांलगतच्या गटारांवर काही ठिकाणी ’बी. एम. सी’चा (मुंबई महानगरपालिका) शिक्का असलेली झाकणे गटारांवर बसविली जात आहेत. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील गटार, रस्ते, पूलांच्या कामांवर ‘के. डी. एम. सी.’चे शिक्के असताना गटारांवर बसविलेल्या झाकणांवर ‘बी.एम.सी.’चे शिक्के कशासाठी, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
डोंबिवली पूर्व भागात मानपाडा छेद रस्त्यावरील संत नामदेव पथाच्या काँक्रिटीकरणाचे दुसऱ्या टप्प्याचे काम ‘एमएमआरडीए’तर्फे सुरू आहे. प्राधिकरणातर्फे या रस्त्यांवरील दुतर्फाच्या गटारांची कामे केली जात आहेत. नव्याने बांधण्यात आलेल्या गटारांच्या झाकणांवर ‘बी. एम. सी.’ (मुंबई महानगरपालिका), ‘एमएमआरडीए’ असा शिक्का असलेली झाकणे बसविण्यात येत असल्याची बाब शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ हा विषय कल्याण डोंबिवली पालिका अधिकाऱ्यांना सांगितला. अधिकाऱ्यांनी एमएमआरडीए परस्पर काय करते, निर्णय घेते, याची कोणतीही माहिती आम्हाला दिली जात नाही. फक्त काही समस्या निर्माण झाली की ते आम्हाला फक्त संपर्क साधतात, असे सांगितले. रस्ते कामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना त्यांनी या झाकणांसंदर्भात विचारणा केली तेही समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. प्राधिकरणाकडून कामे केली जात असल्याने ‘एमएमआरडीए’चे शिक्के असलेली झाकणे एकवेळ समजू शकतात. परंतु, बीएमसीची झाकणे कडोंमपा हद्दीत का, असा प्रश्न थरवळ यांनी केला.
बी. एम. सी.ची कामे पूर्ण झाल्यावर, तेथील देयक काढून झाल्यावर तेथील उरलेली झाकणे येथे वापरण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असा संशय थरवळ यांनी व्यक्त केला. एकाचवेळी डोंबिवलीत प्राधिकरणाकडून अनेक रस्त्यांवर काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामाकडे कोणाचे लक्ष नाही असे समजून काही गैरप्रकार होत असतील तर ते वेळीच रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका अभियंत्यांनी प्रयत्न करावेत. वातानुकूलित दालनात बसून कामे केली तर नंतर निर्माण होणाऱ्या समस्या स्थानिक अधिकाऱ्यांना सोडवायच्या आहेत याचे भान पालिका बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेवावे, असे थरवळ म्हणाले. झाकणांवरून जो गोंधळ झाला आहे तो कायमचा मिटविण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे जिल्हाप्रमुख थरवळ यांनी सांगितले.
“चुकून बी. एम. सी.चा शिक्का असलेली झाकणे संत नामदेव पथावरील गटारावरील काही ठिकाणी लावण्यात आली होती. ठेकेदाराला यासंदर्भात सूचना करून ती तात्काळ काढून टाकण्यात आली आहेत.” – एम. पी. सिंग, कार्यकारी अभियंता, एमएमआरडीए.
हेही वाचा – डोंबिवलीत चतुरंग प्रतिष्ठानचा रविवारी चैत्रपालवी संगीतोत्सव
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३०० कोटींहून अधिक रकमेचा निधी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्ते कामांसाठी एकगठ्ठा उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचे कौतुक. ही कामे करताना त्यांचा दर्जा, त्यावरील नियंत्रण, या कामांची संथगती, गटारांवरी बीएमसीची शिक्का असलेली झाकणे, रस्ते उंच सोसायट्या खाली याकडेही त्यांनी बारकाईने लक्ष द्यावे. म्हणजे भविष्यात उडणारे गोंधळ थांबतील.” – सदानंद थरवळ, कल्याण जिल्हाप्रमुख, शिवसेना ठाकरे समर्थक