कल्याण : कल्याण, डोंबिवलीतील काही रस्त्यांवर सीमेंट काँक्रीटची कामे सुरू आहेत. तर काही ठिकाणी रविवारी राम नवमीनिमित्त उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राम नवमी उत्सव भागातील, निर्माणाधीन काँक्रीट रस्ते भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कल्याणमधील पत्रीपुल येथील कचोरे गाव हद्दीत श्रीराम सेवा मंडळातर्फे रविवारी संध्याकाळी राम नवमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या निर्देशावरून पत्रीपूलकडून न्यू गोविंदवाडी, विकास नाका, कल्याण पूर्वकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कचोरे येथील पत्रीपुलाजवळील शकील खान यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ वाहनांना रविवारी प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने पत्रीपूल, नेतिवली, चक्कीनाकामार्गे, तसेच ठाकुर्ली ९० फुटी रस्ता मार्गे इच्छित स्थळी जातील.

विकासनाका, न्यू गोविंदवाडी, कल्याण पूर्वकडून पत्रीपूलकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना न्यू गोविंदवाडी, नेतिवली पाण्याच्या टाकीच्या उतरणीच्या रस्त्याजवळ वाहनांंना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने विकासनाका, टाटा नाका, कल्याण शिळफाटा, खंबाळपाडा रस्तामार्गे इच्छित स्थळी जातील. रविवारी (ता. ६) संध्याकाळी सहा ते रात्री १२ वाजेपर्यंत ही अधिसूचना लागू असणार आहे.

डोंबिवलीत वाहने बंद

डोंबिवली पू्र्व भागात पाथर्ली रस्त्यावरील शिवमंदिर ते शेलार चौक दरम्यान काँक्रीट रस्त्याचे काम री इन्फ्रा कंपनी करत आहे. या परिसरात कोंडी होऊ नये, रस्ते कामात अडथळा येऊ नये म्हणून उपायुक्त पंकज शिरसाट यांनी पाथर्ली रस्त्यावरील शिवमंदिर ते शेलार चौककडे येणारी वाहतूक शिवमंदिर येथे बंद करण्यात येणार आहे. ही वाहने डावे वळण घेऊन पाथर्ली गावमार्गे इच्छित स्थळी जातील. ही अधिसूचना रस्ता पूर्ण होईपर्यंत ३ मे २०२५ पर्यंत अंमलात असणार आहे.

या रस्ते बंदच्या काळात वाहन चालकांनी शक्यतो पर्यायी रस्ते मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी केले आहे.

अनेक दुचाकी वाहन चालक रस्ता बंद आहे हे माहिती असुनही काम सुरू असलेल्या भागात घुसून रस्ते कामात अडथळा आणि कोंडीत भर घालण्याचा प्रयत्न करतात. अशा वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा वाहतूक अधिकाऱ्यांनी दिला आहे.