कल्याण- मुसळधार पावसामुळे उल्हास, काळू नद्या दुथडी भरुन वाहत असल्याने कल्याण, टिटवाळा, डोंबिवली परिसरातील सखल भागात पाणी साचल्याने रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रस्त्यावर एक ते दोन फूट पाणी आल्याने बहुतांशी रिक्षा चालकांनी प्रवासी वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू झाले आहेत. कल्याणमधील बैलबाजार, डोंबिवली खाडी किनारच्या सखल भागात खाडीचे पाणी चढण्यास सुरुवात झाल्याने चाळी भागातील रहिवाशांनी घरातील आवश्यक सामानाची बांधाबांध करण्यास सुरूवात केली आहे.
हेही वाचा <<< कचराकुंडीत बाॅम्ब असल्याची अफवा पसरविणाऱ्या कल्याण मधील तरुणाला अटक
गुरुवारी मध्यरात्री पासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने डोंबिवली, कल्याण शहर परिसरातील सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. नाले, गटारे ओसंडून वाहत आहेत. काळू नदी इशारा पातळी ओलांडून वाहत आहे. काळू नदीला पूर आल्याने टिटवाळा जवळील रुंदे नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे फळेगाव, रुंदे, उशीद परिसरातील गावांचा टिटवाळा, कल्याण भागाशी संपर्क तुटला आहे. सकाळीच शाळा, कामानिमित्त कल्याण, ठाणे, मुंबई भागात गेलेल्या रहिवासी, विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे. कल्याण मुरबाड महामार्गावरील काळू नदीवरील रायते पूल मुसळधार पाऊस सुरूच राहिला तर संध्याकाळपर्यंत पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या महामार्गावरील रस्ते वाहतूक आता सुरू आहे.
हेही वाचा <<< मुंबई – ठाण्यात संततधार ; सखलभागात पाणी साचण्यास सुरुवात , लोकल संथगतीने सुरू
कल्याण पूर्व भागात वालधुनी नदी, पश्चिमेत शिवाजी चौक, गांधी चौक, लालचौकी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. शहाड परिसरातील गृहसंकुल, झोपड्यांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. डोंबिवलीत नांदिवली पंचानंद, स्वामी समर्थ मठ भागातील रस्ते एक ते दोन फूट पाण्याखाली गेले आहेत. आयरे, कोपर भागातील चाळींमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात पाणी तुंबले आहे. केळकर रस्ता, पाटकर रस्ता, नेहरु रस्ता पाण्याखाली गेले आहेत. या भागातील दुकान चालकांनी दुकानात पाणी शिरल्याने दुकाने बंद केली आहेत.
पालिकेची आपत्कालीन पथके विविध भागात तैनात आहेत. मोहने, आंबिवली, बैलबाजार मधील सखल भागात पाणी तुंबले आहे. खाडी पाण्याचा अंदाज घेऊन बैलबाजार मधील तबेले मालकांनी गोठ्यातील म्हशी अन्य भागात हलविण्याची तयारी केली आहे. काही खासगी शाळा चालकांनी मुसळधार पावसामुळे शाळा सोडून दिल्या आहेत. पालिकेच्या शाळांना तसा शासकीय आदेश नसल्याने या शाळा सोडण्यात आल्या नाहीत, असे प्रशासनाधिकारी विजय सरकटे यांनी सांगितले. मुसळधार पावसामुळे बाजारपेठा, रस्ते ओस पडले आहेत. रस्त्यावरील वाहन वर्दळ कमी झाली आहे. अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर पडू नका असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.