डोंबिवली येथील पूर्व भागात गजानन चौकातील एका संकुलात राहत असलेल्या एका शिक्षिकेच्या घरातून चोरट्यांनी दोन लाख ७० हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज लांबविला. रेश्मा अभिजीत कुंभार असे शिक्षिकेचे नाव आहे. त्या गजानन चौकातील एका संकुलात राहतात. सोमवारी सकाळी त्या कामानिमित्त बाहेर होत्या. घराला कुलुप होते.
संध्याकाळी घरी परतल्यावर त्यांना घराचा कडीकोयंडा तुटला असल्याचे आढळले. त्यांनी घरात जाऊन पाहिले तर स्वयंपाक घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दोन लाख ७० हजार रुपयांचे दागिने गायब होते. चोरट्यांनी दिवसाढवळ्या ही चोरी केली आहे. पाळत ठेऊन ही चोरी केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. रेश्मा कुंभार यांनी याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.