मीरा रोड येथील घटना
चोरी करण्यासाठी चोर नवनव्या क्लृप्त्या नेहमीच शोधत असतात. सध्या लग्न समारंभ धडाक्याने साजरे होत आहेत. अशाच समारंभात बेमालुमपणे वऱ्हाडी बनून चोर आपली हातचलाखी दाखवत असल्याचे उघडकीस आले आहे. या वऱ्हाडी चोरांचा पोलीस सध्या शोध घेत आहेत.
मीरा रोड येथे नुकत्याच झालेल्या लग्नाच्या स्वागत समारंभात चोरांनी चक्क वराच्या आईलाच आपले हस्तकौशल्य दाखवून लाखभर रुपयांचा गंडा घातला आहे. या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चौरांचे हे कृत्य कैद झाले आहे. अत्यंत रुबाबदार पोषाख घातलेल्या दोन व्यक्ती समारंभाच्या ठिकाणी ऐटीत दाखल होत असल्याचे यात स्पष्टपणे दिसून येत आहे. आल्या आल्याच त्यांनी वर आणि वधूच्या जवळच्या नातेवाईकांकडे लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. कोणाकडे रोख रक्कम अथवा दागिने असतील याची चाचपणी त्यांनी सुरू केली.
त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा वराच्या आईकडे वळवला. तिचे लक्ष अन्यत्र गुंतले असल्याची संधी साधून चोरांनी तिच्याकडे असलेली बॅग लांबवली. काहीच घडले नाही अशा थाटात शांतपणे चालत हे चोर समारंभाच्या ठिकाणाहून बाहेर पडले. एक कार त्यांची वाट पहात उभी होती. या कारमध्ये बसून चोरांनी पोबारा केला. बॅगमध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकंदर ९३ हजार रुपयांचा ऐवज होता.
सीसीटीव्हीच्या चित्रणात कारचा क्रमांक अस्पष्ट दिसत असल्याने कारचा शोध लागू शकला नाही. परंतु कार ज्या दिशेने गेली, त्या ठिकाणच्या आणखी काही सीसीटीव्हीची तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे. शहरात अशाच पद्धतीने आणखीन काही घटना घडल्या असून चोरांचा शोध अद्याप लागू शकलेला नाही.