रोडू हेंद्रे मैदान, बदलापूर (प.)

केवळ मोकळी जागा उपलब्ध करून दिली म्हणजे मैदान झाले असे म्हणता येत नाही. तिथे सकाळ-संध्याकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना, खेळण्यासाठी येणाऱ्या खेळाडूंना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे तेथील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षारक्षकाचीही आवश्यकता असते. बदलापूरच्या रोडू हेंद्रे मैदानात तशा अनेक उणिवा आहेत..

बदलापूर शहरात मोठा गाजावाजा करीत उद्घाटन करण्यात आलेले आणि शहरात मध्यवर्ती असलेले पश्चिम विभागातील क्रीडांगण म्हणजे हेंद्रेपाडय़ातील रोडू हेंद्रे मैदान. शहराच्या मधोमध असलेले आणि सहज पोहोचता येणारे असे हे पश्चिमेतील एकमेव मैदान आहे. पहाटे जॉगिंगसाठी इथे बदलापूरकर मोठय़ा प्रमाणावर गर्दी करतात. त्यानंतर मैदानात पोलीस परीक्षा देण्यासाठी तयारी करणाऱ्या स्पर्धकांची ये-जा सुरू असते. तसेच क्रिकेट, फुटबॉल आणि इतर खेळांतील खेळाडूही या मैदानात हजेरी लावतात. सहा महिन्यांपूर्वी शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते या मैदानाशेजारी असलेल्या खुल्या मंचाचे उद्घाटन पार पडले होते. त्यामुळे नव्याने बदलापूरकर झालेल्या नागरिकांनाही याची माहिती झाली. त्यानंतर सकाळी एक फेरफटका मारण्याच्या उद्देशाने तर सायंकाळी विरंगुळा म्हणून येथे येणाऱ्यांची संख्या वाढली. मात्र त्याचसोबत या मैदानाकडून नागरिकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. मैदानात अनेक समस्या असून प्राथमिक सोयीसुविधाही येथे नसल्याने खेळाडू आणि नागरिकांसमोर येथे आल्यानंतर अनेक प्रश्न उभे राहतात.

हेंद्रेपाडय़ातील हे मैदान बदलापूर पश्चिमेतील नागरिकांसाठी सोयीचे आहे. येथे गेल्या अनेक वर्षांपासून विविध शाळांचे आणि महाविद्यालयाचे क्रीडा महोत्सव आयोजित केले जातात. त्याचप्रमाणे अनेक खासगी खेळांच्या स्पर्धाही येथे मोठय़ा प्रमाणावर पार पडतात. त्यामुळे येथे प्राथमिक सोयीसुविधांची आवश्यकता आहे. मैदानाच्या कडेला पेव्हर ब्लॉक बसवून जॉगिंग ट्रॅक बनवला होता. मात्र मैदानाच्या निम्म्याहून कमी भागात पेव्हर ब्लॉक बसवल्याने खूप कमी भागात फिरता येते. मैदानात विविध खेळाडू सरावासाठी येथे येत असतात. मात्र नियम आणि वेळापत्रक नसल्याने येथे खेळाडूंना सरावाला मुकावे लागत आहे. आज मैदानात अनेक महिला खेळाडू सरावासाठी येत असतात. मात्र महिलांना येथे चेंजिंग रूमसारखी सुविधा असणे गरजेचे आहे. मैदानात सरावादरम्यान तहान लागली तर पिण्याच्या पाण्याची सुविधाही नाही. त्यामुळे अनेकदा सराव अध्र्यावर सोडून पाण्यासाठी खेळाडूंना धावाधाव करावी लागते. मैदानाजवळ सार्वजनिक स्वच्छतागृहांचीही आवश्यकता आहे. स्वच्छतागृहांच्या अभावी खेळाडूंना मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागते आहे. प्राथमिक सोयी सुविधांसह महत्त्वाच्या सुविधा नसल्याने ‘नसून अडचण असून खोळंबा’ अशी काहीशी परिस्थिती या मैदानाची झाली आहे. मैदानातील जमिनीचा उंचसखलपणा हीसुद्धा मोठी समस्या खेळाडूंसमोर आहे. कारण त्यामुळे अपघात होऊन खेळाडूंना इजा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मैदानाची निगा राखण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मैदानात आज खेळाडूंसह अनेक दुचाकी चालक आणि सायकलपटूही वावरत असतात. यावरही नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे अनेक खेळाडू सांगतात. त्यामुळे येथे सुरक्षारक्षकाचीही गरज असल्याचे जाणवते.

मैदानातील समस्या

  • मैदानात मोठय़ा प्रमाणावर अस्वच्छता असून त्यासाठी येथे सफाईसाठी कामगारांची नेमणूक करण्याची आवश्यकता आहे.
  • मैदानात वेळेचे नियोजन नसल्याने एकाच वेळी अनेक जण आपापल्या सोयीने खेळासाठी जागा अडवतात. त्यामुळे अनेकदा वाद होण्याची शक्यता असते.
  • मैदानात दुचाकी शिकण्यासाठी अनेक नागरिक येथे येतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता बळावते. त्यावर नियंत्रणासाठी सुरक्षारक्षकाची आवश्यकता आहे.
  • मैदानाशेजारील अनेक सोसायटीचे रहिवासी मैदानाचा वापर रस्ता म्हणून करतात. त्यामुळे अनेकदा छोटे खटके खेळाडू आणि रहिवाशांमध्ये उडताना दिसतात. त्यासाठी मैदानाला सुरक्षा भिंत बांधणे गरजेचे आहे.
  • पोलीस भरतीसाठी सराव करणारे अनेक परीक्षार्थी येथे सरावासाठी येतात. त्यांच्या क्रीडा प्रकारांसाठी जागांचे नियोजन केल्यास, येथून अनेक पोलीस अधिकारी घडू शकतात.
  • जॉगिंग ट्रॅकच्या शेजारी अनेक छोटी झुडपे वाढली आहेत. ती काढून ट्रॅक मोकळा केल्यास एकाच वेळी अनेक नागरिक याचा वापर करू शकतात.

मैदानात हव्या असलेल्या सुविधा

  • मैदानात स्वच्छतागृहांची आवश्यकता आहे. येथे अनेक विद्यार्थी आणि खेळाडू खेळासाठी येत असतात. सर्वत्र स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतागृहांची निर्मिती करण्यात येत आहे. तशीच सुविधा येथेही करण्याची गरज आहे.
  • मैदानात पिण्याच्या पाण्याची सुविधाही नसल्याने, खेळाडूंना सोबत आणलेल्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे त्याचीही सोय करणे गरजेचे आहे.
  • मैदानात थोडय़ाच भागात जॉगिंग ट्रॅकसारखा पट्टा बनवण्यात आला आहे. तोच पट्टा संपूर्ण मैदानाच्या भोवती केल्यास ते आणखी फायद्याचे ठरेल.
  • मैदानातील बराचसा भाग उंचसखल असल्याने अनेकदा खेळाडूंना त्रास होतो. त्यामुळे सपाटीकरण करणे महत्त्वाचे आहे.
  • अनेक महिला खेळाडू मोठय़ा प्रमाणावर येथे खेळण्यासाठी आणि सरावासाठी येत असतात. त्यांच्यासाठी कपडे बदल्याची एखादी जागा उपलब्ध केल्यास येथे महिला खेळाडूंचीही संख्या वाढू शकते. त्यामुळे चेंजिंग रूमची गरज येथे आहे.
  • मैदानातील हिरवळ खेळाडूंसाठी महत्त्वाची असते. त्यामुळे त्यावरही काम होणे गरजेचे आहे.
  • मैदानात एखादा सुरक्षारक्षक असल्यास मैदानात होणाऱ्या नियमबाह्य़ प्रकारांना आळा बसू शकतो.

Story img Loader