गाडीत स्वच्छतागृहाचा अभाव, फलाटांवरही सोय नाहीच
दिवा स्थानकातून पनवेल आणि रोह्य़ाच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिवा-रोहा डेमू गाडीमुळे दिलासा मिळाला असला, तरी या गाडीत स्वच्छतागृहाची सोय नसल्यामुळे सुमारे साडेतीन तासांच्या या प्रवासात प्रवाशांची कुचंबणा होत आहे. दिवा स्थानकातील ज्या फलाटावरून ही गाडी सुटते, त्या फलाटावरही स्वच्छतागृहाची सोय नाही. त्यातच ही गाडी नेहमीच उशिराने सुटत असल्याने प्रवाशांना आपल्या नैसर्गिक गरजा दाबून ठेवूनच गंतव्य स्थानक येण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.
मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये स्वच्छतागृहांचा प्रश्न अत्यंत गंभीर असून अनेक फलाटांवर स्वच्छतागृह नसल्यामुळे प्रवाशांना दररोज मोठा त्रास सहन करावा लागत असतो. दहा फलाटांच्या स्थानकात एकाद दुसरे स्वच्छतागृह लाखो प्रवाशांच्या नैसर्गिक गरजेची पूर्तता करत असून हे धक्कादायक चित्र सगळीकडेच कायम आहे. उपनगरी गाडय़ांचा प्रवास जास्तीत जास्त दोन तासांचा असल्याने प्रवाशांना स्वच्छतागृहाची समस्या जास्त जाणवत नाही. मात्र, डेमू गाडय़ांच्या प्रवाशांसाठी ही कमतरता तापदायक ठरत आहे. दिवा स्थानकातून पनवेल, रोहा आणि वसईकडे धावणाऱ्या डेमू गाडय़ांमध्ये एकही स्वच्छतागृह नसल्यामुळे प्रवाशांना हा प्रवास त्रासदायक ठरत आहे. विशेष म्हणजे ज्या फलाटावरून या गाडय़ा सुटतात, त्या फलाटांवरही स्वच्छतागृह नसल्यामुळे त्याचा त्रास अधिक होतो. पुरुष प्रवासी फलाटांच्या टोकावरील कोपऱ्यात किंवा रुळांवर जाऊन लघुशंका उरकतात. मात्र स्वच्छतागृह नसल्याने महिलावर्गाला अधिक यातना भोगाव्या लागतात. त्यातच ही गाडी नेहमी उशिराने धावत असून प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी अर्धा-अर्धा तास गाडी खोळंबून राहते. त्यामुळे या काळातील प्रवास नकोसा होत असल्याची प्रतिक्रिया प्रवासी विपुल शहा यांनी दिली.
दिवा-रोहादरम्यान धावणारी गाडी सकाळी व संध्याकाळी दिव्यातून सुटते, तर रोह्य़ावरून दिव्याच्या दिशेने दोन फेऱ्या होतात. या गाडीला नेहमीच सापत्न वागणूक देण्यात येत असून प्रवासादरम्यान मेल आणि एक्स्प्रेस गाडय़ांसाठी या गाडय़ा अर्धा ते पाऊण तास एकाच ठिकाणी थांबवून ठेवल्या जातात. त्यामध्ये स्वच्छतागृह नसल्यामुळे प्रवाशांना लघुशंकेसाठी गाडीतून उतरण्याचा धोका पत्करावा लागतो. या गाडय़ांमध्ये तसेच दिवा स्थानकात स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रवासी संघटनेचे आदेश भगत यांनी सांगितले.
दहा हजाराहून अधिक प्रवाशांचे हाल
डेमू गाडय़ा १२ डब्यांच्या असून त्यांची बैठक व्यवस्था बाराशेहून अधिक आहे. मात्र या गाडय़ांमधून दोन हजाराहून अधिक प्रवासी प्रवास करतात. दिवा-रोहा, दिवा-पनवेल आणि दिवा-वसई या मार्गावरून धावणाऱ्या या गाडय़ांमधून दहा हजाराहून अधिक प्रवासी प्रवास करत असून या प्रवाशांना स्वच्छतागृहाअभावी मोठा त्रास सहन करावा लागतो.