डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर सीएसएमटीच्या दिशेकडील भागात फलाटावर गेल्या दीड वर्षापासून छत नाही. या छत नसलेल्या भागात महिला प्रवाशांचा डबा येतो. त्यामुळे उन्हाचे चटके सहन करत आता महिलांना लोकल पकडावी लागते. आता उन्हाचा चटका वाढू लागला आहे. उन्हात बराच काळ उभे राहून लोकल पकडणे महिला प्रवाशांना शक्य होत नाही. अनेक महिला प्रवासी लोकल येईपर्यंत डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर छत असलेल्या भागात उभ्या राहतात. ठाकुर्ली दिशेने लोकल दिसू लागली की मग धावत-पळत, धक्केबुक्के खात छत नसलेल्या लोकलच्या महिला डब्याजवळ येऊन उभ्या राहतात. त्यानंतर त्यांना महिला डबा पकडणे शक्य होते. ही दररोजची कसरत करावी लागत असल्याने महिला प्रवासी संतप्त आहेत.
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर कोपर-सीएसएमटीच्या दिशेने दीड वर्षापासून फलाटावर छत नाही. पावसाळ्यात छत नसल्याने प्रवाशांचे हाल झाले. आता उन्हाचा चटका सहन करत प्रवाशांना प्रवास करावा लागतो. बारा आणि पंंधरा डब्याच्या लोकलच्या थांब्यांसाठी फलाटांचे विस्तारीकरण करण्यात आले. त्यानंतर तात्काळ विस्तारित भागातील फलाटावर छत टाकण्यात येईल असे प्रवाशांना वाटले होते. आता दीड वर्षाचा काळ लोटला तरी रेल्वेकडून छत टाकण्याचे काम केले जात नाही.
उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचच्या कोपर बाजुकडील भागात फलाटावर छत नसल्याने प्रवाशांचे विशेषता महिला प्रवाशांचे हाल होतात हे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी निदर्शनास आणले आहे. या फलाटावरील छताचे काम लवकरच केले जाईल, असे फक्त तोडी आश्वासन अधिकारी देतात. प्रत्यक्ष कृती करत नसल्याचे अध्यक्षा अरगडे यांनी सांगितले. छताची बांधणी करावी म्हणून महिलांसह प्रवाशांनी आंदोलन करावे असे रेल्वे अधिकाऱ्यांना वाटते का. त्याशिवाय हे काम होणार नाही का, असे प्रश्न अध्यक्षा अरगडे यांनी केले आहेत.मध्य रेल्वेच्या इतर स्थानकांमध्ये डोंबिवली रेल्वे स्थानक हे सर्वाधिक प्रवासी तिकीट विक्रीतून रेल्वेला महसूल मिळून देणारे रेल्वे स्थानक आहे. त्यामुळे प्रवाशांच्या त्यांच्या हक्काच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, असे अरगडे यांनी सांगितले.
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवरील विस्तारित फलाटाच्या भागावर छत नाही. छत नसलेल्या भागात महिला डबा येतो. उन्हात उभे राहून महिलांना लोकल पकडावी लागते. इतर प्रवाशांचीही यामध्ये फरफट होते. हा विषय आपण मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून विस्तारित फलाटावर छत बसविण्याची मागणी करणार आहोत.
लता अरगडेअध्यक्षा, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ.