रेल्वे फलाटांवर छत बसवण्याची कामे संथगतीने
पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही ठाणे आणि त्यापलीकडे असणाऱ्या इतर महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवरील विविध संथगतीच्या कामांमुळे प्रवाशांची फलाटांवरील छत्रछाया अजूनही हरपलेलीच आहे. रेल्वेच्या या संथगतीच्या कामांचा फटका प्रवाशांना बसत आहे. छत नसल्याने फलाटावर भर उन्हात त्यांना गाडीची प्रतीक्षा करावी लागते. पुढील महिनाभरात ही कामे झाली नाहीत, तर पावसाळ्यात त्यांच्या हालात भर पडणार आहे.
ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला सुमारे पाच ते सहा लाख प्रवासी प्रवास करतात. या रेल्वे स्थानकात रेल्वेने विविध विकासकामे हाती घेतली आहेत. मात्र, या कामाचा वेग पाहता या कामांसाठी आणखी काही महिने लागण्याची चिन्हे आहेत. फलाट क्रमांक एकवर अजूनही लोंबकळत्या तारांनी प्रवाशांची पाठ सोडलेली नाही. येथे काही ठिकाणी नव्याने छत उभारण्यात आले असले तरी बराचसा भाग अद्याप खुलाच आहे. तसेच कल्याणच्या दिशेला कोपरीहून सॅटिसला जोडणारा एक नवा पादचारी पूल बनविण्यात येत आहे. गेल्या दीड वर्षांपासून या पुलाचे बांधकाम सुरू आहे. या कामामुळे फलाट क्रमांक दोन ते नऊपर्यंत फलाटांवरील छताचा काही भाग काढून घेण्यात आला आहे. ठाणे रेल्वे स्थानकात ४, ५ आणि ६ या फलाटांवरून सर्वात जास्त गर्दी असते. मात्र, हे बांधकामही अद्याप पूर्णत्वाला न आल्याने गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही पावसाचा माराही सहन करावा लागणार आहे.
* कळवा-मुंब्रा : कळवा-मुंब्रा या दोन्ही रेल्वे स्थानकांचीही अशीच अवस्था आहे. कळवा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोन येथील महिलांच्या डब्याजवळ छप्पर नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महिलांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो, तर मुंब््रय़ातही दोन्ही फलाटांवर काही भागात जुनी आणि गळकी छते आहेत.
* दिवा : दिवा स्थानकाला सोसावा लागत आहे. या स्थानकात सध्या नवीन छताची बांधणी करण्यात आली असली तरी ती फक्त फलाट १ ते चापर्यंतच झालेली आहे. काही महिन्यांपूर्वी येथून दिवा-वसई अशी शटल सेवाही सुरू करण्यात आली आहे. मात्र ज्या फलाटावरून ही गाडी जाते. त्या संपूर्ण फलाटावर छत नसल्यात जमा आहे.
* कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ४,५,६,७ येथील काही भाग छताविना आहे. उघडा असलेला भाग महिलांच्या डब्यावरील असल्याने त्याचा नाहक त्रास महिलांना सहन करावा लागत आहे.
* बदलापूर : बदलापूर रेल्वे स्थानकाच्या फलाट एक आणि दोनच्या बहुतेक भागावर छप्परच नसल्याने प्रवाशांना भर उन्हात गाडीची वाट पाहावी लागते. विशेषत: माल डब्यातील व्यापारी आणि महिलांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो आहे. सर्वाधिक वर्दळही याच फलाटांवर असल्याने या फलाटांवर छप्पर टाकण्याची मागणी आता जोर धरते आहे.