भगवान मंडलिक
कल्याण, ठाणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये नोंदणी प्रमाणपत्र (रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र) मिळविण्यासाठी रिक्षा चालक, खासगी वाहन चालक मागील नऊ महिन्यांपासून फेऱ्या मारत आहेत. कार्यालयांमधून नोंदणी प्रमाणपत्र मिळत नसल्याने वाहन चालकांना बँकेकडून कर्ज घेण्यात, वाहन दुसऱ्याच्या नावावर करण्यात अडचणी येत आहेत.
हेही वाचा >>>डोंबिवली रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकला मद्यपी, श्वानांचा विळखा
नवी दिल्लीतील राष्ट्रीय माहिती केंद्रात काही तांत्रिक अडचणी आल्याने आणि व्यवस्थापनाकडून माहिती केंद्रातील आज्ञावली व्यवस्थेत उन्नत्तीकरणाचे काम सुरू असल्याने त्याचा फटका नोंदणी प्रमाणपत्र वितरणाला बसला आहे, असे ‘आरटीओ’ कार्यालयांमधील अधिकाऱ्यांनी सांगितले.यासंदर्भात अनेक वाहन चालकांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये लेखी, तोंडी, ऑनलाईन तक्रारी केल्या आहेत. नोंदणी प्रमाणपत्र वितरित करण्यात येणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कारकुनांच्या समोर सुमारे दोनशेच्या संख्येत मुद्रित न झालेली कोऱी नोंदणी प्रमाणपत्र पडून आहेत. ठाणे, कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालय क्षेत्रातील अनेक रिक्षा चालक, खासगी वाहन मालक मागील नऊ महिन्यांपासून नोंदणी प्रमाणपत्र (आर. सी. बुक) मिळविण्यासाठी कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. त्यांना लवकरच तुमचे काम होईल. विदा गहाळ झाली आहे. नोंदणी प्रमाणपत्र शिल्लक नाहीत. डीजी लाॅकरमध्ये नोंदणी प्रमाणपत्र शोधा अशी उत्तरे दिली जात आहेत. सततच्या या साचेबध्द उत्तरांमुळे वाहन चालक, मालक त्रस्त झाले आहेत. नोंदणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी विहित मार्गाने २७० रुपयांचा भरणा करुनही स्थानिक कार्यालये नोंदणी प्रमाणपत्रे का देत नाहीत याची परिवहन विभागाने दखल घ्यावी. त्यांच्या काही तांत्रिक अडचणी असतील त्या दूर कराव्यात, अशी मागणी वाहन मालकांनी केली आहे.
हेही वाचा >>>डोंबिवलीत ४९ हजार रुपये किमतीचे बकरे चोरीला
जुनी डोंबिवलीतील एका रिक्षा चालक संतोष प्रजापती यांनी सांगितले, आपण मार्चमध्ये नोंदणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी कल्याण आरटीओ कार्यालयात शुल्क भरणा केला आहे. त्यानंतर आठवड्यात मला नोंदणी प्रमाणपत्र मिळणे आवश्यक होते. आता नऊ महिने होत आले तरी मला कल्याण आरटीओ कार्यालयातून नोंदणी प्रमाणपत्र मिळालेले नाही. आपल्या सारखे अनेक रिक्षा चालक या प्रमाणपत्रासाठी कार्यालयात येत आहे. अनेक मध्यस्थ या सगळ्या प्रकाराने त्रस्त आहेत. अनेक मध्यस्थ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही आम्ही नोंदणी प्रमाणपत्रासाठी समग्र माहिती आरटीओ कार्यालयात दिली आहे. तेथे पाठपुरावा करुनही दिल्लीतील राष्ट्रीय माहिती केंद्रातील गोंधळाचे कारण सांगुन स्थानिक कार्यालये नोंदणी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई करत आहेत. याविषयी उघडपणे बोलले तर अनेक विघ्न येतील. त्यामुळे उघडपणे कोणी काही बोलत नाही, असे अनेक मध्यस्थांनी सांगितले. स्थानिक अधिकारी याविषयी दिल्ली केंद्राकडे पाठपुरावा करण्यात कमी पडत आहेत, अशा वाहन मालकांच्या तक्रारी आहेत.
हेही वाचा >>>कल्याण: दहावीच्या विद्यार्थीनीची आत्महत्या
‘एनआयसी’ची दिरंगाई
स्थानिक उपप्रादेशिक कार्यालयात नोंदणी प्रमाणपत्रासाठी वाहन चालकांनी माहिती जमा केल्यानंतर ही माहिती स्थानिक कार्यालयातून मंजुरीसाठी नवी दिल्लीतील राष्ट्रीय माहिती केंद्रात (नॅशनल इन्फाॅर्मेशन सेंटर) पाठविली जाते. तेथे माहितीची छाननी आणि संकलन, मंजुरी मिळते. ती माहिती पुन्हा स्थानिक कार्यालयांकडे प्लास्टिक पट्टीवर मुद्रित करण्यासाठी येते. विदेला मंजुरी आणि मुद्रित करण्यासाठीची माहिती एनआयसी केंद्रातून स्थानिक कार्यालयांना अद्याप कळविण्यात आली नाही. तेथील काही तांत्रिक अडचणी, त्या केंद्रात आज्ञावली उन्नत्तीकरणाचे काम सुरू असल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे, असे ठाणे, कल्याण मधील आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. ठाणे कार्यालयात सुमारे तीन हजार आर. सी. बुक वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत.
“राष्ट्रीय माहिती केंद्रातील तांत्रिक अडचणीमुळे विदा तेथून मंजूर होऊन आला नाही. तरीही आमच्याकडे आर.सी. बुकाची फार प्रकरणे नाहीत. किरकोळ असेल तर ते तात्काळ दिले जाते. जी प्रलंबित आर.सी. बुके आहेत. त्यांची विदा लवकर पाठवा म्हणून एनआयसीकडे पाठपुरावा सुरू आहे.”-विनोद साळवी ,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,कल्याण