Ruta Jitendra Awhad statement viral: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि कळवा-मुंब्राचे जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड या वादात अडकल्या आहेत. मुंब्रा येथे एका कार्यक्रमा मार्गदर्शन करत असताना नकळतपणे त्यांनी केलेल्या एका विधानावर आक्षेप घेतला जात आहे. सदर विधानाचा व्हिडीओ एक्स वर व्हायरल झाला असून ऋता आव्हाड यांच्यावर टीका होत आहे. दरम्यान ऋता आव्हाड यांनी या वादानंतर स्पष्टीकरणही दिले आहे. तसेच त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.
ऋता आव्हाड काय म्हणाल्या?
मुंब्रा येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ऋता आव्हाड यांनी एपीजे अब्दुल कलाम आणि ओसामा बिन लादेन यांची जडणघडण कशापद्धतीने झाली याबाबत सांगितले. त्या म्हणाल्या, “ओसामा बिन लादेनचे आत्मचरित्र वाचा. ज्यापद्धतीने एपीजे अब्दुल कलाम घडले, त्याप्रमाणे ओसामा बिन लादेन का घडू शकला नाही? ओसामा आईच्या पोटातून दहशतवादी बनून आला नव्हता. त्याला समाजाने दहशतवादी बनविले. तो रागातून अतिरेकी झाला. पण त्याचा शेवट काय झाला? अतिशय वाईट पद्धतीने तो मारला गेला. त्यामुळे समाजाने वाचन केले पाहीजे आणि स्वतःला घडविले पाहीजे.”
वादानंतर काय स्पष्टीकरण दिले?
ओसामा बिन लादेनच्या विधानावर वाद निर्माण झाल्यानंतर ऋता आव्हाड यांनी स्वतःचा व्हिडीओ प्रसारित करून स्पष्टीकरण दिले आहे. त्या म्हणाल्या, “आजची पिढी अजिबात वाचन करत नाही. त्यामुळे मी त्यांना महापुरूषांचे चरित्र वाचण्यास सांगितले. तरुण पिढीत मोबाइलचे जे वेड आहे, ते कमी करण्यासाठी मी हा सल्ला दिला होता. त्यासाठी एपीजे अब्दुल कलाम यांचे विंग्ज ऑफ फायर हे पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला. कलाम यांनी हलाखीच्या परिस्थितीतून पुढे येत देशासाठी योगदान दिले. त्यापासून प्रेरणा घेण्याचा सल्ला दिला.”
ऋता आव्हाड पुढे म्हणाल्या, “अब्दुल कलाम यांचे उदाहरण देत असताना आयुष्याची दुसरी बाजूही मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. ओसामा बिन लादेन जन्मतः दहशतवादी नव्हता. पण त्याचा अंत खूप वाईट झाला.”