अंबरनाथ : अंबरनाथ शहराच्या तीन उद्यानांच्या विकासासाठी नगरोत्थान महाअभियानाच्या माध्यमातून १० कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. यासह शहरातील इतर कामांसाठी एकूण २० कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून उद्यानांच्या विकासासह रस्ते कॉंक्रिटीकरण, स्मशानभूमींचे नुतनीकरण, अग्नीशमन केंद्राची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे शहरात नागरिकांना विरंगुळ्यासाठी नवी साधने उपलब्ध होतील.
अंबरनाथ शहरातील उद्यानांचा चेहरामोहरा बदलण्याची मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यांच्या या मागण्या मान्य करत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नगरोत्थान महाअभियानातून अंबरनाथ शहरासाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा केला होता. अखेर अंबरनाथ शहरासाठी तब्बल २० कोटी ५१ लाख रूपयांचा निधी महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी नगरोत्थान महाअभियानाच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. अंबरनाथ पूर्वेतील साई विभागात असलेल्या उद्यानासाठी ३ कोटी ७१ लाख ५९ हजार मंजूर झाले आहेत. एकूण ४ कोटी ९५ लाख ४५ हजारांच्या खर्चातून या उद्यानाची निर्मिती केली जाणार आहे.
उर्वरित निधी अंबरनाथ पालिकेच्या माध्यमातून पुरवला जाणार आहे. तर अंबरनाथ पश्चिम भागातील शंकर हाईट्स येथील उद्यानाच्या निर्मितीसाठी ३ कोटी ७४ लाख ९९ हजार मंजूर करण्यात आलेले आहेत. येथे एकूण ४ कोटी ९९ लाख रूपयांच्या खर्चातून उद्यान उभारले जात असून १ कोटी २५ लाख रूपयांचा निधी पालिकेच्या माध्यमातून उभा केला जाणार आहे. अंबरनाथ पश्चिमेतील सर्वोदयनगर येथील आरक्षण क्र. ८७ वर उद्यान विकसीत करण्यासाठी १ कोटी ७२ लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे अंबरनाथ शहरातील तीन उद्याने विकसीत होणार आहेत. या भागात मोठ्या प्रमाणावर नागरिकरण सुरू आहे. त्यामुळे येथील नागरिकांना विरंगुळ्याची नवी ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
रस्त्याचेही कॉंक्रिटीकरण होणार
अंबरनाथ पश्चिमेतील वाधवा कॉम्पलेक्स ते नाना पाटील चौक हा रस्ता वर्दळीचा आणि महत्वाचा आहे. या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणासाठी निधीची मागणी करण्यात आली होती. यासाठी आता २ कोटी ९९ लाख ४१ हजार रूपये मंजूर करण्यात आले आहेत. तर अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकांच्या संयुक्त अग्नीशमन केंद्रासह ७० एएलपी वाहने उभी करण्यासाठी केंद्र व निवास व्यवस्था उभारण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी २ कोटी ७२ लाख ५६ हजार मंजूर करण्यात आल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. जांभिवलीगाव व जांभिवलीपाडा येथील हिंदू स्मशानभूमीचे नुतनीकरण व सुशोभीकरण करण्याचे काम केले जाणार असून त्यासाठी १ कोटी ४२ लाख ७३ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अंबरनाथच्या मध्यवर्ती भागातील मधु मंगेश कर्णिक उद्यानात ग्रंथालय उभारण्याच्या कामासाठी १ कोटी २३ लाख ६८ हजार रूपये मंजूर झाले आहेत.
बहुउद्देशीय सभागृह
अंबरनाथ पश्चिमेतील मदनसिंग मनवीरसिंग गार्डन, वुलनचाळ येथे बहुउद्देशीय सभागृह बांधण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल २ कोटी ६१ लाख ९२ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या परिसराती महिला, युवक यांना या बहुद्देशीय सभागृहाचा मोठा फायदा होणार आहे. हे भविष्यातील सांस्कृतिक केंद्र ठरू शकते.