दोन महिन्यांत लाखभर नागरिकांचे व्यवहार;९० कोटी रुपयांचा महसूल जमा
प्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन व्यवहारांमुळे वाहनाशी संबंधित कोणत्याही कामासाठी कार्यालयामध्ये वारंवार घालाव्या लागणाऱ्या खेपांचे सत्र आता थांबले आहे. ठाण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ऑनलाइन व्यवहारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. ‘स्मार्ट ठाणे’ उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेने पडलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
डिसेंबर महिन्यापासून प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले. पहिल्याच महिन्यात या नव्या प्रणालीला चांगला प्रतिसाद देत एकूण ४९ हजार ७२८ नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार केले. त्यातून परिवहन खात्याला सुमारे ३६ कोटींचे उत्पन्न मिळाले. जानेवारी महिन्यात ऑनलाइन व्यवहाराला अधिक प्रतिसाद मिळाला. तब्बल ६० हजार ३४८ नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार केले. त्यातून ५३ कोटी ६५ लाख ७७ हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले. डिसेंबरच्या तुलनेत जानेवारीत ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या ग्राहकांची संख्या दहा हजाराने वाढली. तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तिजोरीत १७ कोटींच्या उत्पन्नाची अतिरिक्त भर पडली. फेब्रुवारी महिन्यात आजच्या तारखेपर्यंत जानेवारी महिन्याच्या निम्म्याहून अधिक व्यवहार झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
वाहनाशी निगडित कामांसाठी परिवहन कार्यालयात नागरिकांना अनेकदा हेलपाटे मारावे लागत होते. त्यांचा बराच वेळ त्यात वाया जात होता. वाहन परवाने, वाहन नोंदणी, वाहन कर यांसारख्या अनेक कामांसाठी परिवहन कार्यालयामध्ये लागणाऱ्या मोठय़ाच्या मोठय़ा रांगा आता कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. एरव्ही सदैव गजबजलेल्या परिवहन कार्यालयाच्या आवारात आता लोकांची वर्दळ कमी झाली आहे. त्यामुळे तिथे शांतपणे व्यवहार सुरू असतात. परिवहन कार्यालयांची वाहन परवाने, तात्पुरती नोंदणी, व्यवसाय कर, वाहन कर अशा अनेक प्रक्रिया ऑनलाइन केल्याने नागरिकांना आता घरबसल्या सर्व सुविधा प्राप्त होत आहेत. या प्रणालीला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे.
दंड भरण्यासाठीही संकेतस्थळ
प्रादेशिक परिवहनातर्फे आकारले जाणारे विविध दंड भरण्यासाठी लवकरच नव्या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. दंड आकारणीव्यतिरिक्त परिवहनासंबंधी सर्व व्यवहार हे ऑनलाइन पद्धतीने पार पडतात. नवीन संकेतस्थळानंतर ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीने करता येणे शक्य होणार आहे.
ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ऑनलाइन व्यवहारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. ऑनलाइन व्यवहारांमुळे नागरिकांची पायपीट कमी होणार आहे. व्यवहारांमध्ये काही अडचणी येऊ नयेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
– नंदकिशोर नाईक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी