ठाणे : बांधकाम व्यवसायिकांच्या कामांसंबंधात माहितीच्या अधिकाराचा अर्ज करून त्यानंतर हा अर्ज मागे घेण्यासाठी खंडणी उकळणाऱ्या महेश कणकिया याला ठाणे पोलिसांनी नुकतेच अटक केले आहे. या प्रकरणात आता ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागातील अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांच्याकडे केली आहे. त्यामुळे आता शहर विकास विभागातील अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा >>> लोकलने प्रवास करत डोंबिवलीत येऊन करायच्या चोरी, जेजुरीतून तीन बहिणींना अटक; २३ तोळे सोने आणि रोख जप्त
माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेऊन ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडून ३ लाख ६१ हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या महेश कणकिया याला ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. महेशने अशाप्रकारे अनेक बांधकाम व्यावसायिकांची फसवणूक केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यामुळे आणखी काही बांधकाम व्यवसायिक त्याच्या विरोधात तक्रार देण्यास पुढे येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे.
हेही वाचा >>> ठाणे :पोलीस वसाहतीतील वीज मीटर बॉक्सला आग; आगीत ३६ मीटर बॉक्स जाळून खाक
शहरात माहिती अधिकाराखाली अर्ज करून व्यवसायिकांकडून खंडणी उकळणाऱ्यांसोबत काही अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा आरोप सातत्याने होत असतो. अशा प्रकरणांमध्ये त्रस्त झालेल्या व्यावसायिकांच्या अनेक तक्रारी यापूर्वीच आल्या होत्या, असे संजय केळकर यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी आता थेट पोलीस आयुक्तांकडे काही अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा >>>> डोंबिवलीत देसलेपाड्यात जिम मालकाकडून ९ लाखांची वीजचोरी; महावितरणकडून चालक-मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
बांधकाम व्यावसायिकांना नाहक त्रास देऊन त्यांची पिळवणूक करणाऱ्यांचे जाळे उद्ध्वस्त करताना महापालिकेतील शहरविकास खात्यातील काही संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी केळकर यांनी पोलीस आयुक्त आणि सहआयुक्त यांच्याकडे केली आहे. अवैधपणे बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना महापालिकेने कदापि पाठीशी घालू नये, पण ज्यांना नाहक त्रास दिला जातो, त्यांना अवश्य न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.