डोंबिवली पूर्व, पश्चिम भागातील काही रिक्षा चालक मनमानीने भाडे आकरणी करणे, वाहनतळावर उभे राहून प्रवासी वाहतूक न करणे, अशा प्रकारची उद्दामगिरी करत असल्याने उपप्रादेशिक परिवहन कल्याण विभागाच्या (आरटीओ) पथकाने दोन दिवस डोंबिवली पूर्व, भागात अचानक रिक्षा तपासणी मोहीम राबवून सुमारे ४० बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई केली. या कारवाईत दीड लाखाहून अधिक रकमेचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती साहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी यांनी दिली.
हेही वाचा- मुंब्रामध्ये दुकाने, रिक्षा बंद
डोंबिवलीतील काही रिक्षा चालक मनमानी करुन भाडे आकारणी करतात. प्रवाशांनी विचारणा केल्यावर इच्छित स्थळी भाडे घेऊन जाण्यास नकार देतात. बहुतांशी रिक्षा चालक गणवेशात रिक्षा चालवित नाहीत. अशा तक्रारी गेल्या काही दिवसांपासून साहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी साळवी यांच्याकडे प्रवाशांकडून करण्यात आल्या होत्या. बहुतांशी तक्रारी रिक्षा चालक मनमानीने भाडे आकारणी करत असल्याच्या आणि वाहतुकीला अडथळा होईल, अशा पध्दतीने प्रवासी वाहतूक करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
हेही वाचा- जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल! ठाणे शहरात ठिकठिकाणी जाळपोळ; पाहा धक्कादायक Video
‘आरटीओ’च्या मोटार वाहन निरीक्षक अनिल धात्रक, दिनेश ढाकणे, वाहतूक शाखा उपनिरीक्षक नवनाथ चव्हाण, हवालदार विकास सोनार, गणेश कोळी, शिरोडे, ठोंबरे, कांबळे यांच्या विशेष पथकाने शनिवारी अचानक डोंबिवलीत येऊन मुख्य चौक, वर्दळीच्या रस्त्यांवर रिक्षांची तपासणी मोहीम सुरू केली. या कारवाईने रिक्षा चालकांची भंबेरी उडाली. रिक्षेत तीन प्रवासी वाहतुकीला परवानगी असताना काही रिक्षा चालक चालकाच्या बाजुला चौथा प्रवासी घेऊन प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले. बहुतांशी रिक्षा चालक गणवेशात नव्हते. काही रिक्षा चालकांकडे रिक्षेची कागदपत्र आढळून आली नाहीत. तर काही जणांच्याकडे मूळ मालक वेगळाच तिऱ्हाईत इसम रिक्षा चालवित असल्याचे तपासणी पथकाच्या निदर्शनास आले.
या रिक्षा चालकांकडून दोन हजार रुपयांपासून ते आठ हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात आला. काही रिक्षा चालकांना नोटिसा देऊन ‘आरटीओ’ कार्यालयात सुनावणीसाठी हजर राहण्याच्या नोटिसा देण्यात आल्या. डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्ता, बाजीप्रभू चौक, पश्चिमेत दिनदयाळ रस्ता, विष्णुनगर रेल्वे स्थानक परिसर, महात्मा फुले रस्ता भागात ही मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत ४० रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दीड लाखाहून अधिक दंड वसूल करण्यात आला. कारवाई सुरू होताच अनेक रिक्षा चालकांनी जवळ कागदपत्र नसल्याने घरी पळणे पसंत केले. तर काही चालक शहराच्या आतील भागातील रस्त्यांवर दडी मारुन बसले होते.
हेही वाचा- ठाणे:शिंदे गटाला बळ,राज्यभरातील कार्यकर्ते पक्षात; सुषमा अंधारे यांच्या विभक्त पतींचाही प्रवेश
वाहतूक विभाग आक्रमक
डोंबिवली पश्चिम विष्णुनगर रेल्वे स्थानक भागात रेल्वे प्रवेशद्वार अडवून रिक्षा चालक प्रवासी वाहतूक करत असल्याने डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी सकाळी नऊ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत तीन पाळ्यांमध्ये विष्णुनगर रेल्वे प्रवेशव्दारावर वाहतूक पोलीस कर्तव्यावर ठेवले आहेत. आता सतत पोलीस या भागात तैनात असल्याने बेशिस्त रिक्षा चालकांची कोंडी झाली आहे. गेल्या आठवडाभरात रेल्वे प्रवेशव्दार अडवून प्रवासी वाहतूक करणाऱ्या सुमारे ५० हून अधिक रिक्षा चालकांवर वाहतूक विभागाने कारवाई केली आहे.
डोंबिवलीत काही रिक्षा चालक मनमानी करुन भाडे आकारत आहेत अशा तक्रारी आल्या होत्या. त्या अनुषंगाने डोंबिवलीतील ४० रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई नियमित सुरू ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती कल्याणचे साहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी यांनी दिली.