कल्याण-गेल्या काही दिवसांपासून कल्याण, डोंबिवलीत मनमानी करून प्रवासी भाडेवाढ करणे, प्रवाशांशी हुज्जत घालून वाढीव भाडे आकारणे, मोटार वाहन कायद्याचे सर्व नियम धुडकावून रिक्षा प्रवासी वाहतूक करणे असे प्रकार कल्याण, डोंबिवली परिसरात रिक्षा चालकांकडून सुरू आहेत. अशा बेशिस्त रिक्षा चालकांवर कायद्याचा बडगा उगारण्यासाठी कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाने सोमवारपासून डोंबिवली, कल्याण परिक्षेत्रात रिक्षा चालकांची तपासणी मोहीम सुरू केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या कारवाईमुळे रिक्षेची कागदपत्र जवळ नसणे, गणवेशात नसणाऱ्या रिक्षा चालकांची पळापळ झाली आहे. कल्याणचे प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात डोंबिवलीत शिवसेनेचे माजी नगरसेवकांनी काही रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींना हाताशी धरून बेकायदा रिक्षा वाढ केली. रिपब्लिकन रिक्षा संघटनेचे रामा काकडे यांनी मनमानी करून प्रवासी भाडे केली होती. याविषयी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी साळवी यांनी रिक्षा संघटना पदाधिकारी काकडे, शिवसेना पुरस्कृत संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांना कार्यालयात बोलावून मनमानी भाडेवाढीचे अधिकार तुम्हाला कोणी दिले. तुमच्या संघटनेची मान्यता का रद्द करू नये म्हणून तंबी दिली होती.

आरटीओ अधिकारी कल्याण, डोंबिवलीत वेळोवेळी रिक्षा तपासणी करत नसल्याने काही रिक्षा चालक मनमानी करून प्रवासी वाहतूक करत असल्याच्या तक्रारी वरिष्ठांकडे गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आरटीओ अधिकारी साळवी यांनी डोंबिवली, कल्याणमधील रिक्षा चालकांची मनमानी पाहून बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. २० मोटार वाहन निरीक्षकांचे एक पथक तयार केले आहे. एका पथकात १० जण आहेत. हे पथक अचानक एखाद्या रस्ते, रिक्षा वाहनतळावरील रिक्षा चालका जवळील कागदपत्रे, तो वाढीव भाडे घेतो का, तो गणवेशात आहे का याची तपासणी सुरू केली आहे. बेशिस्त चालकांना ५०० रूपये ते तीन हजार रूपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येत आहे, असे साळवी यांनी सांगितले. एखादा रिक्षा चालक अनेक वेळा दोषी आढळून आला तर त्याचे परमिट काही महिन्यासाठी रद्द केले जाणार आहे.

माजी आरटीओ अधिकारी तानाजी चव्हाण यांच्या काळात आरटीओ अधिकारी किरकोळ अपवाद वगळता नियमित रिक्षा तपासणीसाठी रस्त्यावर उतरले नाहीत. आपणास कोणी काही करू शकत नाही, अशी मुजोर रिक्षा चालकांमध्ये निर्माण झाली आहे, अशा प्रवाशांच्या प्रतिक्रिया आहेत.
डोंबिवली, कल्याणमधील अनेक रिक्षा चालक वाढीव भाडे आकारत आहेत. चौथा प्रवासी घेऊन वाहतक करणे, गणवेशात नसणे, वाहनतळावर उभे न राहता रस्ते, चौकात उभे राहून नियमबाह्य प्रवासी वाहतूक करत आहेत अशा रिक्षा चालकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.-विजय साळवी,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी),कल्याण

आरटीओने आठवड्यातून दोन ते तीन वेळा नियमित डोंबिवली, कल्याणमध्ये रिक्षा तपासणी मोहीम सुरू करावी. यामुळे बेशिस्त रिक्षा चालक आणि त्यांच्या मनमानीला आळा बसणार आहे.-लता अरगडे,अध्यक्षा उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघ,डोंबिवली