डोंबिवलीत गेल्या आठवड्यात रिपब्लिकन रिक्षा चालक मालक संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने मनमानीने रिक्षा प्रवासी भाडे वाढ करून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या प्रस्तावित भाडे दर पत्रकाला आव्हान दिले होते. याविषयीची वातावरण निवळत नाही, तोच बुधवारी सकाळी आयरे प्रभागातील शिवसेनेच्या तीन नगरसेवकांनी रिक्षा भाड्याचे सुधारीत दर जाहीर केल्याने खळबळ उडाली आहे.

कल्याणचे प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी यांनी मंगळवारी डोंबिवली, कल्याणमधील रिक्षा संघटनांची बैठक घेतली. या बैठकीत रिक्षा चालकांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाने यापूर्वी जाहीर केलेल्या भाडे दराप्रमाणे भाडे वसुली करावी. कोणीही रिक्षा चालक, रिक्षा संघटनांनी मनमानी करून रिक्षा भाडे वाढ, सुधारीत भाडे आकारणी करू नये, असे स्पष्ट आदेश आरटीओ अधिकारी साळवी यांनी संघटना पदाधिकाऱ्यांना दिले होते.

बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी डोंबिवली पूर्वेतील आयरे, तुकारामनगर प्रभागाचे शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी पाटील, नितीन पाटील, माजी नगरसेविका रंजना नितीन पाटील आणि शिवसेना खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचं छायाचित्र असलेले रिक्षा सुधारीत भाडे दराचे फलक डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक ते आयरे, तुकारामनगर प्रभागातील रिक्षा वाहनतळांवर लावण्यात आले आहेत. अशाप्रकारे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना डावलून परस्पर सुधारीत भाडे आकारणीचा अधिकार या नगरसेवकांना कोणी दिला, असा प्रश्न डोंबिवलीतील प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. राजकीय मंडळी आरटीओंना डावलून परस्पर रिक्षा भाडे वाढ, दर कमी करण्याचा निर्णय घेऊ लागली तर शहरात रिक्षा चालक आणि प्रवाशांमध्ये अराजक माजेल, अशी भीती प्रवाशांनी व्यक्त केली.

सुधारीत भाडे दर

आयर रोड, लक्ष्मण रेषा, तुकाराम नगर येथील नागरिकांच्या मागणीनुसार रिक्षा संघटनांशी चर्चा करून सुधारीत भाडे दर लागू करण्यात आले आहेत. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक ते आयरे, तुकारामनगर, लक्ष्मण रेषा शेअर पध्दतीत प्रति व्यक्ती भाडे यापूर्वी १० रूपये होते. ते शिवसेना नगरसेवकांनी १२ रूपये केले आहे. खासगी रिक्षा दर यापूर्वी २० रूपये भाडे होते. ते आता एक रूपयांनी वाढविण्यात आले आहे. गुरुवार, ९ जूनपासून ही प्रवासी भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे, असे माजी नगरसेवक नितीन पाटील, रवी पाटील यांनी फलकावरील मजकुरात म्हटले आहे. या सुधारीत रिक्षा भाडे वाढीला अनुमती आणि सहकार्य केल्याने पाटील बंधूंनी शिवसेनेचे माजी नगरसेवक महाराष्ट्र रिक्षा चालक मालक सेनेचे अध्यक्ष तात्या माने, लाल बावटा रिक्षा चालक मालक सेनेचे अध्यक्ष काळू कोमासकर, महाराष्ट्र चालक मालक सेनेचे कार्याध्यक्ष संजय मांजरेकर, आदर्श रिक्षा चालक मालक सेनेचे अध्यक्ष देवराम चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

मतदारांच्या सहानुभूतीसाठी

येत्या ऑक्टोबरमध्ये कल्याण डोंबिवली पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांची सहानुभूति मिळविण्यासाठी थेट सुधारीत रिक्षा दरवाढीचा विषय शिवसेना नगरसेवकांनी हाती घेतल्याने रहिवासी आश्चर्य व्यक्त करत आहेत. थेट कायद्याला आव्हान देण्याचा प्रयत्न या नगरसेवकांनी केला आहे, असी टीका सर्वस्तरातून केली जात आहे. इतर रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या सुधारीत भाडेदराविषयी तीव्र नाराजी व्यक्त करून आरोटीओनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नागरिक, रिक्षा संघटनांशी चर्चा करून सुधारीत रिक्षा दर लागू केले आहेत. एक ते दोन रूपयांची वाढ आहे. लोकांच्या मान्यतेने हा निर्णय घेतला आहे असं शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी पाटील यांनी सांगितलं आहे.

“डोंबिवलीत राजकीय मंडळींनी सुधारीत रिक्षा भाडे दर फलक लावल्याच्या तक्रारी आल्या आहेत. प्रत्यक्ष पाहणी करून यासंबंधी कारवाईचा निर्णय घेतला जाईल,” असं कल्याण प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी यांनी म्हटलं आहे.