डोंबिवली : डोंबिवलीतील रिक्षांची उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) कल्याणमधील अधिकाऱ्यांनी शुक्रवारी तपासणी केली. या तपासणीत १२५ रिक्षा आरटीओच्या पथकाने तपासल्या. यामधील ४० हून रिक्षा चालकांवर नियमभंग प्रकरणी पाच हजारापासून ते वीस हजार रूपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात आली.

डोंबिवलीत सुमारे एक हजाराहून अधिक आयुर्मान संपलेल्या भंगार रिक्षा चालकांकडून चालविण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. अनेक रिक्षा चालक गणवेश परिधान करत नाहीत. काही गणवेशावर बिल्ला, नावाची ओळखपट्टी लावत नाहीत, काही रिक्षा चालक दामदुप्पट भाडे आकारत आहेत. मोटार वाहन कायद्याचे पालन न करता रिक्षा चालवित असल्याच्या तक्रारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांच्याकडे आल्या होत्या.

हेही वाचा…चुकीची पूररेषा हे त्यांचेच पाप, शिवसेनेच्या वामन म्हात्रेंचा आमदार किसन कथोरेंवर हल्लाबोल

अशा बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करण्यासाठी शुक्रवारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारकुल यांच्या आदेशावरून साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक रोहीत पवार, साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रियंका टपळे, साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विजय नरवाडे यांच्या पथकाने डोंबिवली पूर्व भागात अचानक येऊन रिक्षा चालकांजवळील कागदपत्रांची तपासणी केली. अनेक रिक्षा चालक गणवेशात नव्हते. काही रिक्षा चालक रिक्षा वाहनतळ सोडून प्रवासी वाहतूक करत होते. काही रिक्षा चालकांनी गणवेशावर बिल्ला, नाव ओळखपट्टी लावली नव्हती. काही रिक्षा चालकांच्या परवान्याची मुदत संपली होती. काहींचे पीयुसी संपले होते. अशा सर्व रिक्षा चालकांवर घटनास्थळीच मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केले म्हणून पाच हजार रूपये ते २० हजार रूपयांपर्यंत दंडात्मक कारवाई पथकाने केली.

आरटीओकडून डोंबिवलीत कारवाई सुरू होताच डोंबिवली रेल्वे स्थानक भागात नियमबाह्यपणे रिक्षेने प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा चालक आरटीओ अधिकाऱ्यांची नजर चुकवून पळून गेले. इंदिरा चौक, बाजीप्रभू चौक, मानपाडा रस्ता, चार रस्ता, महात्मा फुले रस्ता चौक, पंडित दिनदयाळ चौक, जुने विष्णुनगर पोलीस ठाणे भागातील रस्त्यांवर रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे रेल्वे स्थानक प्रवेशव्दार अडवून प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा चालक गायब झाले होते.

हेही वाचा…दहशतवादी विरोधी पथक आणि ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची भिवंडीत कारवाई, भिवंडीतून आठ बांगलादेशी अटकेत

डोंबिवलीतील १२५ रिक्षांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करून रिक्षा चालविणाऱ्या ४० हून अधिक बेशिस्त रिक्षा चालकांना पाच हजार रूपये ते २० हजार रूपये दंड ठोठावण्यात आला. ही कारवाई यापुढेही वरिष्ठांच्या आदेशावरून सुरू ठेवण्यात येणार आहे.

रोहीत पवार साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक,कल्याण.अशाप्रकारची कारवाई आरटीओकडून नियमित झाली पाहिजे. रिक्षा वाहनतळ सोडून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर वचक निर्माण होईल. शेखर जोशी उपाध्यक्ष, रिक्षा संघटना

Story img Loader