किशोर कोकणे
ठाणे : आता पुढील ध्येय हे ऑलिम्पिक पदकाचे असून, या स्पर्धेत भारतासाठी पदक मिळवून देण्यासाठी कठोर मेहनत घेईन, असा निर्धार १८ वर्षीय रुद्रांक्ष पाटीलने व्यक्त केला.
‘‘दररोज सकाळी १० ते सायंकाळी चार असा शरीर-मनाची कसोटी पाहाणारा सराव, एकाग्रता साधण्यासाठी विशेष प्रशिक्षण आणि तज्ज्ञ-मार्गदर्शकांच्या सहवासात केलेले परिश्रम यामुळे जर्मनी येथे हे यश मी मिळवू शकलो. देशासाठी जागतिक पातळीवर असा ‘लक्ष्यवेध’ साधण्यासाठी यापुढेही सातत्यपूर्ण कामगिरी करण्याचे आव्हान पेलावे लागेल आणि मी यासाठी तयार आहे,’’ असे रुद्रांक्षने सांगितले.
रुद्रांक्षने आतापर्यंत १७ राष्ट्रीय स्पर्धेत आणि १२ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदके कमावली आहे. कनिष्ठ गटात रुद्रांक्ष राष्ट्रीय क्रमवारीत अग्रस्थानावर आणि जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे. ठाण्यातील हिरानंदानी मेडोज येथे राहणारा रुद्रांक्ष हा ठाण्याचे वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील आणि परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकारी हेमांगिनी पाटील यांचा मुलगा आहे.
‘‘जर्मनी येथे झालेल्या स्पर्धेमुळे चांगला अनुभव मिळाला आहे. माझ्या संपूर्ण मेहनतीचे श्रेय माझे दोन्ही प्रशिक्षक अजित पाटील, स्नेहल कदम, डॉ. आनंद नाडकर्णी, फिजिओथेरिपिस्ट, आई-वडील, हिरानंदानी, सिंघानिया शाळा तसेच या प्रक्रियेतील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी झालेल्या सर्वानाच जाते,’’ अशी कृतज्ञता रुद्रांक्षने व्यक्त केली.
अपघाताने नेमबाज
• ‘‘२०१२ ते १४ या कालावधीत मी परिमंडळ पाचचा उपायुक्त होतो. त्यावेळी २०१४ मध्ये मेजर गावंड यांच्या द्रोणाचार्य नेमबाजी केंद्राचे उद्घाटन केले होते. या उद्घाटनाप्रसंगी तेथील प्रशिक्षक स्नेहल कदम यांनी रुद्रांक्षलाही प्रशिक्षणाला पाठविण्याची विनंती केली. रुद्रांक्षला फुटबॉल आणि स्केटिंगमध्ये आवड होती. मी सांगितल्याने तो प्रशिक्षणासाठी जात राहिला. २०१४मध्ये जिल्हा, आंतरशालेय स्पर्धेत त्याची कामगिरी उंचावू लागली होती. तसेच पदके मिळू लागल्याने शाळेत सत्कार होत होता. हे सर्व अनुभवल्यानंतर त्याला यामध्ये रुची निर्माण झाली,’’ असे रुद्रांक्षचे वडील बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
• ‘‘रुद्रांक्ष सकाळी १० ते सायं. ४ वाजेपर्यंत रोज सराव करतो. त्यानंतर सायं. ५ वा. पवईला फिजिओथेरपीसाठी जातो. रात्री घरी परतण्यास बराच उशीर होतो. अथक परिश्रम केल्याने तो येथपर्यंत पोहोचू शकला. त्याच्या आईनेही यासाठी मेहनत घेतली,’’ पाटील यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा