डोंबिवली पूर्वेतील स्वामी समर्थ मठ भागातील नांदिवली पंचानंद येथे रविवारी पुनर्विकासासाठी एक इमारत तोडताना ठेकेदाराने धुळ प्रतिबंधक कोणत्याही उपाययोजना न करता शक्तिमान यंत्रांच्या साहाय्याने दिवसभर तोडकाम केल्याने या भागात धुळीचे लोट पसरले होते. परिसरातील रहिवासी, पादचारी, प्रवासी या धुळीने हैराण होते.
विशेष म्हणजे इमारत तोडण्याच्या बाजुला एका खासगी रुग्णालय आहे. या रुग्णालयातील रुग्णांना या धुळीचा प्रचंड त्रास झाल्याच्या तक्रारी आहेत. परिसरातील रहिवाशांच्या घरात धूळ पसरल्याने त्यांना दरवाजे, खिडक्या बसून घरात बसावे लागते. या भागातील रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना धुळीचा सामना करत प्रवास करावा लागत होता.
मुंबई उच्च न्यायालयाने हवेतील धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना पालिकांंना केल्या आहेत. गेल्या वर्षापासून कल्याण डोंबिवली पालिकेच्या पर्यावरण विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी धूळ प्रतिबंंधक उपाययोजना न करता इमारत तोडणाऱ्या, धुळीचे प्रदूषण करणाऱ्या अनेक विकासक, ठेकेदारांंवर दंडात्मक कारवाया केल्या आहेत.
नांदिवलीत धुळीचे लोट
हे माहिती असुनही डोंबिवली पूर्वेतील नांदिवली पंचानंद येथे नांदिवली लाईफ केअर रुग्णालयाच्या समोर रविवारी सकाळपासून एक इमारत पुनर्विकासासाठी तोडण्याचे काम शक्तिमान यंंत्राच्या साहाय्याने ठेकेदाराने सुरू केले होते. हे तोडकाम सुरू करण्यापूर्वी ठेकेदाराने इमारतीच्या चारही बाजुला २५ फूट उंचीचे पत्रे, चारही बाजुने हिरव्या जाळ्या लावून धूळ नियंत्रित करणे, पाडकाम करण्यापूर्वी आणि करताना इमारतीवर टँकरव्दारे पाण्याचे फवारे मारणे ही कर्तव्य पाडकाम करताना संबंधित ठेकेदाराने पार पाडणे आवश्यक होते. ठेकेदाराने यामधील एकही अट पूर्ण केली नाही, असे या भागातील रहिवाशांंनी सांंगितले.
हेही वाचा… कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
पाडकाम करण्यापूर्वी या भागातील अनेक रहिवाशांनी ठेकेदाराला धूळ प्रतिबंधक उपाययोजना करण्याची सूचना केली, त्याची दखल ठेकेदाराने घेतली नाही. दिवसभर तोडकाम करून ठेकेदाराने परिसरात धुळीचे प्रदूषण केले, अशा तक्रारी रहिवाशांंनी केल्या. हे पाडकाम करणाऱ्या ठेकेदाराने न्यायालयाच्या आदेशाचा आणि पालिका प्रशासनाचे आदेश दुर्लक्षित करून इमारत पाडकाम केल्याने या ठेकेदारावर पालिकेने दंडात्मक कारवाई करून धूळ प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या शिवाय ठेकेदाराला इमारत बांधकाम तोडण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
नांदिवली पंचानंद भागात एक पुनर्विकासाची इमारत तोडताना धूळ प्रतिबंधक कोणत्याही उपाययोजना न करता रविवारी पाडकाम केले असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित ठेकेदाराने नियमांचे उल्लंघन केल्याने त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. – रोहिणी लोकरे, कार्यकारी अभियंता, पर्यावरण विभाग, कडोंंमपा.
नांदिवली पंचानंद येथील इमारत तोडणाऱ्या ठेकेदाराने धुळीचे प्रदूषण केल्याने त्यांना नोटीस पाठवून त्यांचे पाडकाम तातडीेने थांबविण्याचे आदेश देण्यात येत आहेत. धुळीचे प्रदूषण केल्याने त्यांच्यावर उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. – भारत पवार, साहाय्यक आयुक्त, ई प्रभाग, डोंबिवली.