ठाणे : महापालिका कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी म्हणून प्रशासनाने नवा निमय करत तसा आदेश काही दिवसांपूर्वी काढला असून त्यानुसार कामाच्या वेळेत महापालिका मुख्यालय इमारतीमधील आवारात उभे राहून कर्मचाऱ्यांना मोबाईलवर बोलण्यास मनाई लागू करण्यात आली आहे. परंतु सुरक्षा रक्षकांकडून कर्मचाऱ्यांसोबतच पालिका मुख्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांबरोबरच लोकप्रतिनिधींनाही इमारतीमधील आवारात उभे राहण्यास मनाई करण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या शिस्तीसाठी करण्यात आलेल्या नियमाचा त्रास ठाणेकरांना होत असल्याचे चित्र आहे.
ठाणे महापालिकेतील काही कर्मचारी कामाच्या वेळेत मुख्यालय इमारतीतील आवारात फिरताना दिसून येतात. त्याचबरोबर काही कर्मचारी मुख्यालय इमारतीमधील आवारात मोबाईलवर बोलत असतात. ही बाब महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आली असून अशा कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी म्हणून ठाणे महापालिका प्रशासनाने नवा नियम तयार केला आहे. त्यासंबंधीचा आदेशही महापालिका प्रशासनाने काही दिवसांपुर्वी काढला आहे. या आदेशानुसार कामाच्या वेळेत मुख्यालय इमारतीतील आवारात फिरणारे तसेच मोबाईलवर बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सुरक्षारक्षकांना लक्ष ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच अशा कर्मचाऱ्यांना इमारतीमधील आवारात फिरण्यास तसेच मोबाईलवर बोलताना आढळून आल्यास हटकण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. केवळ कर्मचाऱ्यांसाठीच हा नियम लागू केलेला असतानाही सुरक्षारक्षकांकडून मात्र सर्वच नागरिकांना पालिका मुख्यालय इमारतीमधील आवारात उभे राहण्यास मनाई करताना दिसत आहेत.
हेही वाचा : रेल्वे, ओएनजीसी मध्ये नोकरीला लावतो सांगून कल्याण मध्ये डाॅक्टरची १२ लाखांची फसवणूक
महापालिकेत कामानिमित्त येणाऱ्या माजी नगरसेवक आणि पालिका अधिकाऱ्यांनाही सुरक्षारक्षकांकडून आवारात उभे राहण्यास मनाई केली जात आहे. याबाबतचे कारण मात्र सुरक्षारक्षकांना देता येत नसून केवळ वरिष्ठांच्या सुचना असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. ठाणे महापालिकेत नागरिक आणि माजी लोकप्रतिनिधी कामासाठी येत असतात. अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गर्दी असल्यामुळे नागरिक मुख्यालय इमारतीच्या आवारात उभे राहतात. त्यांना अशाप्रकारे निर्बंध घालणे चुकीचे असून त्यामागेचे कारणही सांगितले जात नाही, अशी प्रतिक्रीया भाजपचे माजी नगरसेवक मिलींद पाटणकर यांनी दिली.
हेही वाचा : डोंबिवलीतील पाथर्ली येथे तीन वर्षाच्या मुलाला सावत्र आईने ठार मारले
महापालिका मुख्यालय इमारतीमधील आवारात काही कर्मचारी कामाच्या वेळेत उभे राहून मोबाईलवर बोलत उभे असतात. अशा कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी म्हणून इमारतीमधील आवारात कर्मचाऱ्यांना उभे राहण्यास आणि मोबाईलवर बोलण्यास मनाई लागू करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेला नियम नागरिकांसाठी वापरला जात असेल तर, सुरक्षारक्षकांना तशा सुचना देण्यात येतील. – मारुती खोडके , उपायुक्त , ठाणे महापालिका