कल्याण – मुसळधार पावसामुळे टिटवाळ्या जवळील काळू नदीवरील रूंदे पूल बुधवारी दुपारी पाण्याखाली गेला. त्यामुळे या पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. या पुलावरील वाहतूक बंद झाल्याने परिसरातील १२ गावांचा कल्याण परिसराशी असलेला संपर्क तुटला आहे.टिटवाळा जवळील रूंदे गाव हद्दीतून काळू नदी वाहते. या नदीवरील पूल नदीच्या पाणलोट स्तरापासून कमी उंचीचा आहे. त्यामुळे पावसाळ्यात काळू नदी दुथडी भरून वाहू लागली की रूंदे पूल पाण्याखाली जातो. मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने काळू नदीला पूर आला आहे. या पुरामुळे रूंदे पूल पाण्याखाली गेला आहे.
कल्याण, टिटवाळा भागात जाण्यासाठी फळेगाव, उशीद, हाल, मढ, पळसोली, काकडपाडा, दानबाव, नडगाव, वावेघर, राया, उतणे, ओझर्ली, चिंचवली, कुंभारपाडा गावांमधील रहिवासी रुंदे पुलाचा वापर करतात.सकाळी या गावांमधून दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेते कल्याण, मुंबई परिसरात गेले होते. हे व्यावसायिक घरी परतताना रूंदे पुलावर पाणी असल्याने अडकून पडले. टिटवाळा, कल्याण भागात शाळांमध्ये येणारे विद्यार्थ्यांना या पुराचा फटका बसला.
हेही वाचा >>>कळवा-मुंब्य्रात जितेंद्र आव्हाड यांना धक्का; आठ माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा अजित पवार गटात प्रवेश
न्यायालय आवार पाण्यात
कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानक भागात स्मार्ट सिटी प्रकल्पाची कामे सुरू आहेत. या भागात या कामांमुळे काही ठिकाणी गटारे बांधण्यात आलेली नाहीत. काही ठिकाणी नाल्यांमध्ये पाणी वाहून जाण्यासाठीच्या मार्गात अडथळे आहेत. त्यामुळे मुसळधार पाऊस सुरू झाल्यापासून कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसर, कल्याण जिल्हा न्यायालय, तहसीलदार कार्यालय, दिलीप कपोते वाहनतळ भागात पाणी साचत आहे.
न्यायालयात आवारात पाणी तुंंबत असल्याने वकिलांसह अशिलांना या पाण्यातून येजा करावी लागते. तहसीलदार कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांचीही तीच अवस्था आहे. आता रस्ता वरील भागात आणि न्यायालयाची इमारत खालच्या भागात गेल्याने न्यायालय आवारात पाणी तुंबण्याचे प्रमाण अधिक आहे.या भागातील पाणी उपसा करण्यासाठी पालिकेने तीन उच्च दाबाचे पंप बसविले आहेत.