कल्याण तालुक्यातील टिटवाळा शहरा जवळील रूंदे नदीवरील पूल मुसळधार पावसाच्या लोंढ्याने पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे परिसरातील आठ ते १० गावांचा कल्याण, टिटवाळा शहरांशी असलेला संपर्क तुटला आहे. पुरामुळे पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
स्थानिक महसूल, ग्रामपंचायत प्रशासनाने रुंदे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्य, राष्ट्रीय आपत्ती दलाची पथके कल्याण परिसरात तैनात आहेत. या पथकांनी रुंदे नदीला आलेला पूर, परिसरातील गावांची पाहणी केली. उल्हास खोऱ्यातील पावसाचे पाणी रायता, काळू, उल्हास नदीतून खाडीला जाऊन मिळते.
रुंदे नदी परिसरात उशीद, फळेगाव, मढ, गोरले, भोंगाळपाडा, हाल गावे आहेत. शहापूर, वासिंद, खडवली भागातील बहुतांशी वाहन चालक रस्ते मार्गाने रुंदे पुलावरून टिटवाळा, कल्याणकडे येतात. रुंदे नदी परिसरातील बहुतांशी ग्रामस्थांचा दूध व्यवसाय आहे. या भागातील नोकरदार कामानिमित्त मुंबई परिसरात नोकरीसाठी जातात. पूर ओसरेपर्यंत त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. या गावांमधील अनेक विद्यार्थी टिटवाळा, कल्याण, म्हारळ भागातील शाळांमध्ये शिक्षणासाठी येतात. त्यांची रुंदी नदीला पूर आल्याने अडचण झाली आहे. शाळेच्या बस या भागात कशा न्यायच्या असा प्रश्न शाळा चालकांना पडला आहे.
काळू नदीवरील गुरवली पुल मुसळधार पाऊस सुरूच राहिला तर पाण्याखाली जाण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. पुलावरून पाणी वाहत असेल तर कोणीही वाहन चालकाने पुलावरून जाण्याचे धाडस करू नये असे आवाहन पूल परिसरात प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्याने नागरिकांनी कामा शिवाय घरा बाहेर पडू नये. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर घाबरून जाऊ नये. या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे, असे आवाहन कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात केले जात आहे.