मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांच्या बदललेल्या वेळापत्रकामुळे घरी परतताना हाल

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई विद्यापीठाने जाहीर केलेले प्रथम वर्ष पदवी परीक्षांचे नवे वेळापत्रक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय गैरसोयीचे ठरू लागले आहे. या वेळापत्रकानुसार सायंकाळी सहा वाजता परीक्षेची वेळ संपत असल्याने दुर्गम भागांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांना घरी परतताना अडचणी येत आहेत. त्यातच सध्या सूर्यास्त लवकर होत असल्याने ग्रामीण भागातील वाहतूक लवकर थंडावत असल्याने या विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर घरापर्यंत पोहोचण्यासाठी सत्त्वपरीक्षा द्यावी लागत आहे.

[jwplayer CdTbNsE8]

मुंबई विद्यापीठाने यंदाच्या वर्षांपासून पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षांच्या सर्व विषयांच्या परीक्षांचे नियोजन स्वत:कडे ठेवले आहे. पहिल्या टप्प्यात परीक्षांचे वेळापत्रक आणि प्रश्नपत्रिका विद्यापीठाकडून देण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात परीक्षांचे वेळापत्रक आणि प्रश्नपत्रिका विद्यापीठाकडून देण्यात येत असल्याने परीक्षांचा कालावधीही लांबला आहे. त्यामुळे महाविद्यालयांची चांगलीच तारांबळ उडत आहे. त्यातच नवीन वेळापत्रकाचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फटका बसू लागला आहे.

सध्या कला, विज्ञान, वाणिज्य तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. त्यातील जवळपास सर्वच परीक्षा या दुपारी तीन ते सहाच्या दरम्यान घेण्यात येत आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमांसह यापूर्वी सर्व विषयांच्या परीक्षा या अडीच तासांच्या होत्या. मात्र काही व्यावसायिक अभ्यासक्रम वगळता आता सर्व अभ्यासक्रमांसाठी शंभर गुणांच्या परीक्षा विद्यापीठाने जाहीर केल्या आहेत. त्यामुळे तीन तासांचा पेपर असतो. पेपर संपल्यानंतर महाविद्यालयातून बाहेर पडेपर्यंत अध्र्या तासाचा वेळ जातो. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ, शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना त्यामुळे मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी असल्याने त्यांना घरी जाण्यासाठी राज्य परिवहनच्या बस गाडय़ांवरच अवलंबून राहावे लागते. अनेक खेडी मुख्य मार्गापासून आत असल्याने तेथे जाणाऱ्या वाहनांची संख्या आणि खासगी वाहतूक व्यवस्था खूप कमी असते. त्यामुळे एखादे वाहन चुकल्यास विद्यार्थ्यांना पायपीट करण्याशिवाय पर्याय नाही. सध्या हिवाळा असल्याने सूर्यास्तही लवकर होतो आहे. अशावेळी अनेक विद्यार्थी घरी वेळेत किंवा अंधारापूर्वी पोहोचण्यासाठी लवकर पेपरही सोडून जात असल्याचे दिसते आहे.

महाविद्यालयांचेही वेळापत्रक कोलमडले

महाविद्यालयांना या नव्याने आलेल्या वेळापत्रकांचा मोठा फटका बसला असून त्यांचा अधिक वेळ या परीक्षांचे व्यवस्थापन करण्यातच जातो आहे. त्यामुळे द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या पुढच्या अभ्यासक्रमाच्या अध्यापनासाठीही कमी काळ मिळणार आहे. अपुऱ्या वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत त्यांना करावी लागणार आहे. त्यात दोन महिन्यांवर बारावीच्या परीक्षा येऊन ठेपल्यामुळे त्या परीक्षांचे नियोजन कसे करायचे, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

परीक्षांच्या बदललेल्या वेळापत्रकामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांना घरी जाण्यास अनेक अडथळे पार करावे लागत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही पुरेशी नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अध्यापनाचे वेळापत्रकही बिघडणार असून येत्या काळात प्राध्यापक, विद्यार्थी आणि महाविद्यालय अशा सर्वाना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे भविष्यात ग्रामीण महाविद्यालयांचा विचार अशा वेळापत्रकाच्या नियोजनावेळी व्हावा.

डॉ. के.बी. कोरे, प्राचार्य, जीवनदीप महाविद्यालय, गोवेली

[jwplayer PuSvtqP8]

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rural students suffer exam time table change by mumbai university