वाढत्या नागरीकरणामुळे कल्याण शहराच्या पश्चिम विभागाची सीमा येत्या काही वर्षांमध्ये अगदी भिवंडी शहराच्या वेशीला टेकणार आहे. पूर्वी या दोन शहरांदरम्यान फारशी वाहतुकीची साधने नव्हती. मात्र आता रस्ते सुविधा, रिक्षा, खासगी वाहने, बस अशी सगळ्या प्रकारची साधने उपलब्ध झाल्याने भिवंडी परिसरातील चाकरमानी, रहिवासी, व्यापाऱ्यांचा ओघ कल्याणकडे अधिक वाढला आहे. यापूर्वी भिवंडीचा रहिवासी, व्यापारी नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबईत जाणारा असेल तर तो ठाण्याला जाऊन तेथून पुढचा प्रवास करायचा. आता चित्र पूर्णपणे पालटले आहे. भिवंडी शहर, परिसरातील रहिवासी, चाकरमानी रिक्षा, बस, खासगी वाहनांनी कल्याणमध्ये येऊन तेथून ते मुंबई, नाशिक, पुणे दिशेचा प्रवास करीत आहे. दळणवळणाच्या या सुविधांमुळे भिवंडीचा भार आता कल्याण शहरावर पडला आहे.
टिळक चौक, पारनाका रामबागपर्यंत मर्यादित असलेले कल्याण शहर आता परिसरातील गावांच्या हद्दी ओलांडून ‘नवीन कल्याण’ म्हणून विकसित होत आहे. याशिवाय गंधारे नदीच्या काठावर सुमारे २०० एकर परिसरात स्मार्ट सिटीचा भाग म्हणून नवीन कल्याण विकसित करण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला आहे. त्यामुळे दहा-पंधरा वर्षांत कल्याण पश्चिमेत मोकळा भूभाग म्हणून कोठे पाहायला मिळणार नाही. विकास झाल्यानंतर या वाढत्या गर्दीचा भार कल्याण रेल्वे स्थानकावर येणार आहे. मात्र या वस्तुस्थितीचा सध्या कोणत्याही यंत्रणेकडून दूरदृष्टीने विचार होताना दिसत नाही. सध्या नवे कल्याण परिसरात अनेक लहान-मोठी गृहसंकुले उभारली जात आहेत. तिथे राहण्यासाठी येणारा रहिवासी हा नोकरदार, चाकरमानी, उद्योजक, व्यावसायिक असणार आहे. त्यांचा नियमित संपर्क हा आपल्या उपजीविकेसाठी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे परिसराशी असणार आहे. मग हा वाढता भर कल्याण रेल्वे स्थानकाने पेलावा म्हणून रेल्वे प्रशासन कोणत्या आणि काय उपाययोजना करीत आहे. ज्या प्रमाणात कल्याण परिक्षेत्रात बांधकाम व्यवसाय वाढत आहे, तो अंदाज घेऊन कल्याण रेल्वे स्थानकात वाढते पादचारी पुलांची उभारणी होणे आवश्यक आहे.
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात पालिकेने स्कायवॉकची उभारणी केल्यामुळे रस्ते वाहतुकीवर जो भार येत होता, तो काही प्रमाणात कमी झाला आहे. प्रवासी स्कायवॉकवरून वरच्या वर प्रवास करून आपल्या इच्छित स्थळी जात आहेत. कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १ ते ७ च्या दरम्यान मध्यभागी सर्व फलाटांना जोडणारा पादचारी पूल उभारण्यात आला आहे. त्यामुळेही प्रवाशांची सोय झाली आहे. या पुलाला पर्याय म्हणून टिटवाळा, कर्जत बाजूने आणखी एक प्रशस्त पूल उभारणीचे काम सुरू आहे. त्यामुळे पश्चिमेतील प्रवासी थेट पादचारी पुलावरून कल्याण पूर्व भागात जाणार आहे. हेही ठीक. परंतु प्रवासी जेव्हा लोकलमधून फलाटांवर उतरतो आणि तो जिन्यावर चढत असतो. त्या वेळची त्याची घुसमट कोंडीची आगाऊ कल्पना देते. पादचारी पूल प्रशस्त करण्यात आले आहेत, पण प्रवाशांना ऐसपैस ये-जा करण्यासाठी जो महत्त्वाचा मार्ग आहे, तो म्हणजे फलाटावरून पादचारी पुलावर येण्यासाठी आवश्यक असलेला जिना. हे जिने अनेक ठिकाणी निमुळते आहेत. त्यामुळे पाच ते सहा रांगा करून, घुसमटीतून प्रवासी खाली-वर ये-जा करीत असतात. फलाट क्रमांक १ ते फलाट क्रमांक ३ च्या दरम्यान असलेल्या जुन्या पादचारी पुलावरून नवीन पादचारी पुलावर चढण्यासाठी, उतरण्यासाठी जे सात ते आठ पायऱ्यांचे पोहच जिने देण्यात आले आहेत, हे जिने आहेत की माऊंट एव्हरेस्टचे शेवटचे टोक आहे, असे वाटते. अगदी धडधाकटांचीही येथे दमछाक होते. ज्येष्ठ नागरिकांची काय अवस्था होत असेल? पुन्हा जंक्शन स्थानक असल्याने येथे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक. त्यांच्याकडे बरेच सामान असते.
प्रवाशांची परिक्रमा
कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १, फलाट क्र. १ ए या फलाटांवरून बहुतेक कल्याण लोकल मुंबईच्या दिशेने सुटतात. या दोन्ही फलाटांवर उतार आणि चढण्यासाठी फक्त टिटवाळा, कर्जत बाजूच्या दिशेने जिने आहेत. या फलाटांवर उतरणाऱ्या प्रवाशांचे सर्वात मोठे दु:ख म्हणजे त्यांना एकाच बाजूकडील जिन्यावरून रिक्षा वाहनतळावर किंवा रेल्वे स्थानकाबाहेर जावे लागते. त्यांचे दुसरे दु:ख म्हणजे अनेक प्रवासी छत्रपती शिवाजी टर्मिनस बाजूकडील म्हणजे शेवटच्या डब्यांमध्ये बसलेले असतात. हे प्रवासी जेव्हा कल्याण रेल्वे स्थानकात (फलाट क्र. १, १ ए वर) येतात आणि हे प्रवासी मागच्या डब्यांमध्ये बसले असतील (सीएसटीकडील) तेव्हा त्यांना फलाटावरून ५०० ते ६०० फुटांची पायपीट करीत टिटवाळा दिशेकडील जिन्यांचे दिशेने यावे लागते. गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा या दोन्ही फलाटांवर उतरणाऱ्या प्रवाशांचा परिपाठ आहे.
फलाट क्र. १, १ ए वर ‘सीएसटी’ बाजूच्या दिशेने एक पादचारी जिना काढून त्याचे एक टोक सवरेदय गार्डन किंवा सांगळेवाडीच्या दिशेने उतरविले आणि याच जिन्याचे एक टोक फलाट क्र. १ जवळील जरीमरी नाल्याच्या कोपऱ्याला किंवा सार्वजनिक प्रसाधनगृहाजवळ (व्होडाफोन गॅलरीसमोर) उतरविले तर रेल्वे स्थानकात एकाच जिन्यावर प्रवाशांचा जो भार येतो तो कमी होईल. याशिवाय दोन बाजूला जिने उतरविल्यामुळे लोकग्राम, बाजारपेठ, पत्रीपुलाच्या दिशेने जाणारा प्रवासी सांगळेवाडी किंवा सर्वोदय गार्डन जिन्यावरून पुढचा प्रवास करील. हा प्रवासी रेल्वे तिकीट कार्यालय किंवा आगाराजवळील रिक्षा थांब्यावर येणार नसल्याने या भागात दररोज जी सकाळ, संध्याकाळ प्रवाशांची गर्दी होते ती गर्दी होणार नाही. गर्दीचे विभाजन करण्यासाठी फलाट क्र. १, १ ए च्या सीएसटी बाजूकडे पादचारी पूल होणे आवश्यक आहे.
प्रसाधनगृहाजवळ जिन्याचे एक टोक उतरविले तर टिळक चौक, गांधी चौक, शिवाजी चौक भागांत नियमित रेल्वे स्थानकाकडून पायी घरी जाणाऱ्या प्रवाशांची सोय होईल. त्यामुळे प्रवासी रेल्वे तिकीट बुकिंग, दीपक हॉटेल चौक भागात जाणार नाही. फलाट क्र. १, १ ए वर सीएसटी दिशेने जिन्यांची पर्यायी व्यवस्था झाली तर पश्चिम रेल्वे स्थानक भागात सध्या गर्दीचा जो बजबजाट पाहण्यास मिळतो तो कित्येक प्रमाणात कमी होण्यास हातभार लागणार आहे. कल्याण रेल्वे स्थानकातील प्रवाशांचे आणखी एक दुखणे आहे. ते म्हणजे टिटवाळा-कर्जत दिशेकडील जुन्या पादचारी पुलावरून प्रवासी फलाट क्रमांक ३ ते अगदी फलाट क्रमांक ७ वर उतरतो. शहराच्या विविध भागांतून मोठय़ा मुश्किलीने रिक्षा मिळवून रेल्वे स्थानकात आलेला प्रवासी जेव्हा अतिजलद लोकल पकडण्यासाठी जुन्या जिन्यावरून (टिटवाळा बाजूकडील) फलाट क्रमांक ६ किंवा ७ वर येतो. तेव्हा येणारी लोकल उतरणाऱ्या जिन्यापासून फर्लागभर पुढे जाऊन थांबते. लांब पल्ल्यांच्या गाडय़ांसाठी बांधण्यात आलेल्या या फलाटांवर जलद लोकल धावतात. त्यामुळे अनेक वेळा प्रवाशांना जिना उतरताना लागलेला दम, त्यात पुन्हा जिन्यापासून काही फर्लागावर लोकल जाऊन थांबत असल्याने प्रवाशांची त्रेधातिरपीट उडते. हा प्रवाशांचा रोजचा अनुभव आहे. शहाड, गंधारे, बारावे, रामबाग, टिळक चौक, गांधी चौक, आधारवाडी अशा कोणत्याही भागातून येणाऱ्या प्रवाशाला या व्यायामाचा हा रोजचा अनुभव घ्यावा लागतो. प्रवाशांना होणारा हा त्रास विचारात घेऊन फलाट क्रमांक एकची तिकीट खिडकी ते फलाट क्र. ७ च्या दरम्यान एक पादचारी पूल उभारण्यात आला तर प्रवाशांना दररोज लोकल पकडण्यासाठी जी धावण्याची स्पर्धा करावी लागते, तो त्यांचा त्रास कमी होईल. याशिवाय लांब पल्ल्यांच्या गाडय़ांमधून येणाऱ्या प्रवाशांना सामानासह जिन्यावरून चढून इच्छितस्थळी जाणे सुलभ होईल. कल्याण शहर परिसराचा चारही बाजूने ज्या प्रमाणात भौगोलिक विकास होत आहे, त्या प्रमाणात कल्याण रेल्वे स्थानकातील प्रवासी सुविधा खूप कमी पडत आहेत. त्याचा आताच विचार करण्यात आला नाही तर उलटय़ासुलटय़ा धावपळीमुळे रेल्वे स्थानकात प्रवाशांची कोंडी आणि धकाधकी होईलच; पण सर्व प्रकारचे सोडवणुकीचे मार्ग उपलब्ध असूनही प्रवाशांना लोकल पकडणे आणि स्थानकातून बाहेर पडल्यावर रिक्षा पकडण्यासाठी परिक्रमा कराव्या लागतील. त्या बंद करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने वेळीच पाऊल उचलावे.