डोबिवली – ठाकुर्लीतील विठाई सोसायटी ते चोळे स्मशानभूमी दरम्यान गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या सीमेंट काँक्रीट रस्त्याचे काम एमएमआरडीएच्या निधीतून सुरू आहे. ही कामे करताना वाहतुकीला अडथळा येणारी पाच ते सहा रस्ता बाधित झाडे रस्त्यामधून न काढता ठेकेदाराने सीमेंट काँक्रीटचे काम सुरू केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

चोळे स्मशानभूमी ते विठाई सोसायटी दरम्यानचा रस्ता हा ९० फुटी रस्त्याचा जोड रस्ता आहे. ठाकुर्ली चोळे गावातील हनुमान मंदिर रस्ता ते म्हसोबा चौक दरम्यानच्या रस्त्यावर काही दुरुस्तीचे काम, वाहन कोंडी झाली तर प्रवासी चोळे स्मशानभूमी ते विठाई सोसायटी दरम्यानच्या रस्त्याचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करतात. मागील अनेक महिने या रस्त्यावर फक्त खडी टाकून ठेवण्यात आली होती. चोळे स्मशानभूमी ते विठाई सोसायटी दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण, सीमेंट काँक्रीटीकरण करण्याची प्रवाशांची मागणी होती.

अनेक दुचाकी स्वार या खडीच्या रस्त्यावर घसरून पडत होते. पावसाळ्यात या रस्त्यावरून चालणे अवघड होत होते. मंंगल कलश सोसायटी ते बंदिश पॅलेश हाॅटेल दरम्यान वळसा घेऊन जाण्यापेक्षा प्रवासी अनेक वेळा चोळे स्मशानभूमी रस्त्याने ९० फुटी रस्त्याला जातात. महिला समिती शाळा रस्त्यावरून चोळे स्मशानभूमी ते विठाई सोसायटी दरम्यान जाण्यासाठी रस्त्यात काही चाळी, बांधकामे आहेत. हा रस्ता रुंदीकरण करताना बाधितांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. त्यामुळे स्मशानभूमी अलीकडील ३० मीटरचा रस्ता ठेकेदाराला रुंदीकरण करता आलेला नाही, असे समजते.

विठाई सोसायटी ते स्मशानभूमी रस्त्याचे काँक्रीटीकरण करताना काही निसर्गप्रेमी नागरिकांनी रस्ते मार्गात बाधित होणारी झाडे तोडण्यास विरोध केला आहे. ही झाडे तोडली नाहीत तर काँक्रीट रस्ते काम करणे शक्य होणार नाही, असे ठेकेदार व प्रकल्प सल्लागाराने स्थानिकांना सांगुनही रहिवासी ऐकण्यास तयार नाहीत. ही झाडे तोडण्यासाठी आपण पालिकेत अर्ज केला आहे. तिकडच्या प्रक्रिया पूर्ण झाल्या की झाडे तोडण्याची कारवाई केली जाईल, असे ठेकेदाराकडून स्थानिक नागरिकांना सांगण्यात येते.

काँक्रीट रस्त्याचे काम विहित वेळेत पूर्ण करण्याचे बंधन ठेकेदारावर असल्याने ठेकेदाराने काही दिवसापूर्वी झाडे रस्ते मार्गात ठेऊन सीमेंट काँक्रीटचे काम करण्यास सुरुवात केली आहे. झाडे रस्त्यामध्येच असताना काँक्रीटीकरण केल्याने वाहने या रस्त्यावरून धावणार कशी, अशाप्रकारचे काँक्रीटकरण करून ठेकेदार काय साध्य करत आहे. यामध्ये नागरिकांचा पैसा फुकट जात आहे, असे प्रश्न नागरिक करत आहेत. झाडे तोडण्याची परवानगी मिळाली तर ती झाडे मुळासकट तोडताना सीमेंटचा रस्ता खराब होणार आहे. हे माहिती असुनही हा रस्ता काँक्रीटचा करण्यात आल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. स्थानिकांच्या दुहेरी भूमिकेमुळे ठेकेदार कोंडीत सापडला आहे.

ही झाडे तोडण्यासाठी वेळेत परवानगी मागितली असती तर तात्काळ परवानगीच्या प्रक्रिया पूर्ण करता आल्या असत्या असे पालिका उद्यान विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.