ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ५६ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असल्याची माहिती ठाणे जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाद्वारे देण्यात आली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्यासाठी आपत्ती निवारण कक्षातर्फे शुक्रवारी काही मदत क्रमांक जाहीर करण्यात आले होते. या मदत क्रमांकांद्वारे जिल्हयातून आतापर्यंत ५६ पालकांनी त्यांची मुलं युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली आहे.
जिल्ह्यातील जे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आलेत त्यांची माहिती तत्काळ राज्य आपत्ती निवारण कक्षाकडे पाठविण्यात येत असल्याचे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले आहे. भारतातून रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. सध्या या दोन देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे भारतातील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्याचे काम केंद्र सरकारकडून सुरु आहे. या पार्श्ववभूमीवर ठाणे जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाद्वारे युक्रेनमध्ये गेलेल्या विदयार्थ्यांच्या पालकांसाठी मदत क्रमांक जाहीर करण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, मुरबाड, भिवंडी आणि नवी मुंबई, अंबरनाथ, मिरा-भाईंदर, बोरिवली, पडघा, नेरुळ, वाशिंद, घणसोली, कामोठे, उल्हासनगर आणि ऐरोली या शहरांतील ५६ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेले असल्याची माहिती समोर आली आहे. युद्ध परिस्थितीत मुलं अडकल्याने सरकारने त्यांना लवकरात लवकर सुखरूपरीत्या मायदेशी परत घेऊन यावे अशी मागणी या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.
पालकांनी येथे संपर्क साधावा –
ठाणे जिल्ह्यातील जे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत त्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांची माहिती देंण्यासाठी ०२२-२५३०१७४०/२५३८१८८६ या संपर्क क्रमांकावर आणि thaneddmo@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधण्याचे जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाद्वारे आवाहन करण्यात आले आहे.