आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून अंबरनाथ येथील ‘साद फाऊंडेशन’ने तालुक्यातील वांगणीजवळील बेडीस गावात जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात चित्रकला स्पर्धा, विद्यार्थी मेळावा याशिवाय मनोरंजनाचे कार्यक्रम घेतले. या वेळी संस्थेतर्फे उबदार कपडे, चादरी, ब्लँकेटस्, बूट आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
दुसऱ्या आठवडय़ात ११ जानेवारीला संस्थेतर्फे गावात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. वस्तीतील ८० मुला-मुलींनी त्यात सहभाग घेतला. संक्रांतीच्या मुहूर्तावर १५ जानेवारीला गावात विद्यार्थी मेळावा भरविण्यात आला. दिवसभराच्या या मेळाव्यात मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. बौद्धिकाबरोबरच मुला-मुलींनी या मेळाव्यात गाणी, गोष्टी आणि धम्माल गप्पांचाही आनंद घेतला. १२५ विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी झाले होते. त्यानंतर १८ जानेवारी रोजी विविध प्रकारच्या खेळांच्या स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या.
या क्रीडा महोत्सवात तब्बल २५० मुला-मुलींनी आपले क्रीडाकौशल्य दाखविले. त्यानंतर रविवार, २५ जानेवारी रोजी विनामूल्य आरोग्य शिबीर भरविण्यात आले होते. नेत्रतज्ज्ञ अजित कुलकर्णी, अर्चना कुलकर्णी, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. लीना हांडे, डॉ. रमेश देवके आणि डॉ. रवींद्र भगत यांनी शिबिरात ग्रामस्थांची तपासणी केली. तब्बल १७५ ग्रामस्थांनी त्याचा लाभ घेतला. संध्याकाळी गावातील मुला-मुलींचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला. गावातील महिलांनीही पारंपरिक नृत्य सादर केले. पारितोषिक वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. माधुरी पुराणिक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर मनीषा वाघ यांनी आभार मानले.

Story img Loader