ठाणे : मुंब्रा बाह्यवळण मार्गावर पावसाळ्यात होणारे भूस्खलन रोखण्यासाठी या मार्गावर लवकच सुरक्षा उपाययोजना केल्या जाणार आहेत. दरवर्षी पावसाळ्यात या मार्गावर भूस्खलन होत असते. त्यामुळे काही महिन्यांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील सहा धोकादायक ठिकाणांचे सर्वेक्षण केले होते. तेथे सुरक्षा उपाययोजना करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे देण्यात आला होता. त्याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत केले जाणार आहे. मुंब्रा बाह्यवळण मार्गालगत सुरक्षा उपाययोजना केल्यास वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंब्रा बाह्यवळण मार्ग हा अवजड तसेच हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. उरण जेएनपीटी येथून वाहतुक करणारी हजारो अवजड वाहने भिवंडी, गुजरात आणि नाशिकच्या दिशेने वाहतुक करण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. या मार्गावरून ठाणे, कळवा भागातून नवी मुंबईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या हलक्या वाहनांची वाहतुक होते. हा मार्ग डोंगरातून जात असून तो अरुंद आहे. त्यामुळे पावसाळ्यात अनेकदा या ठिकाणी भूस्खलन होत असते. भूस्खलनामुळे वाहतुक कोंडीचा फटका वाहन चालकांना सहन करावा लागतो. दरड कोसळल्यास अपघाताची भिती व्यक्त केली जाते. या मार्गालगत मोठ्याप्रमाणात लोकवस्ती आहे. दरड कोसळल्याने सुमारे दोन वर्षांपूर्वी एका घरावर दरड कोसळून महिलेचा मृत्यू झाला होता. त्यामुळे वाहन चालक आणि रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
हेही वाचा >>>कल्याणमध्ये सापाड गावातील रस्ता रूंदीकरणातील बांधकामे हटवली
मुंब्रा बाह्यवळण मार्गाची देखभाल आणि दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जाते. काही महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने भूस्खलन रोखण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील सहा ठिकाणांचे सर्वेक्षण करून येथे उपाययोजना करण्याचा आराखडा तयार केला होता. परंतु हे काम आता राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केले जाणार आहे. या कामास मंजूरी मिळाल्यास वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या संदर्भात राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली.