बदलापूरः काही महिन्यांपूर्वी बदलापुरातील चिमुकल्यांच्या अत्याचार प्रकरणाची झळ देशभर पोहोचली. त्यानंतर उभ्या करण्यात आलेल्या आंदोलनात हजारोंनी सहभाग नोंदवला. तर त्यापूर्वी सागर इन्व्हेस्टमेंट घोटाळ्यात अनेकांची कोट्यावधींची फसवणूक झाली. या दोन प्रकरणात पुढाकार घेऊन लढा देणारे नेतृत्व आज विधानसभेच्या रिंगणात आहेत. मनसेच्या संगिता चेंदवणकर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे बंडखोर शैलेश वडनेरे या दोघांकडून या दोन्ही प्रकरणातील आंदोलक आणि गुंतवणुकदारांना पाठिंब्यासाठी हाक दिली जाते आहे. त्यांच्या यांना किती पाठिंबा मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बदलापूर शहरातील एका नामांकीत शाळेत चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची दखल देशभरातील नेत्यांना घ्यावी लागली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल होण्यासाठी आणि कारवाईत गती येण्यासाठी मोठे आंदोलन उभे रहावे लागले. या प्रकरणात सुरूवातीपासून मनसेच्या संगिता चेंदवणकर होत्या. गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांचा पाठपुरावा होता. त्यानंतर कारवाई दिरंगाई होत असल्याचे पाहत त्यांनी आंदोलनाची हाक दिली. त्यात त्यांना विविध पक्षांच्या महिला पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळाला. याप्रकरणी संगिता चेंदवणकरांवरही गुन्हा दाखल झाला. तर त्या आंदोलकांना जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील होत्या. राज ठाकरे यांनीही चेंदवणकर यांचे कौतुक केले होते. मनसेच्या चेंदवणकरांमुळे हे प्रकरण बाहेर आले, असे राज ठाकरे अनेकदा जाहीर भाषणात सांगतात. त्यामुळेच चेंदवणकर यांच्या गळ्यात मनसेच्या उमेदवारीची माळ पडली. सध्या समाजमाध्यमांवर संगिता चेंदवणकर आणि त्यांचे समर्थक याच मुद्द्यावरून मतदारांना साद घालत आहेत. स्वतः संगिता चेंदवणकर रेल्वे स्थानक परिसरात प्रचार करताना दिसत आहेत. मीच ती संगिता, अशा आशयाचे फलक त्यांच्याकडून प्रसारीत केले जात आहेत.

तर दुसरीकडे काही वर्षांपूर्वी बदलापुरात सागर इन्व्हेस्टमेंट या गुंतवणूक कंपनी अचानक बुडाली. यात हजारो गुंतवणुकदारांचे कोट्यावधी रूपये गुंतले होते. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यावेळी शिवसेनेत असलेले आणि सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात असलेले शैलेश वडनेरे यांच्या पुढाकाराने हे प्रकरण न्यायालयापर्यंत गेले. आरोपीची अटक, आर्थिक गुन्हे शाखेपर्यंत गुंतवणुकदारांना पोहोचवणे, आरोपींच्या मालमत्तांची जप्तीसाठीची मागणी अशा विविध टप्प्यांवर वडनेरे सक्रीय होते. त्यामुळे गुंतवणुकदारांमध्ये त्यांच्यासाठी सकारात्मक भावना आहे. याच गुंतवणुकदारांना आता वडनेरे साद घालत आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला आणि गुंतवणुकदार वडनेरे यांच्यासाठी प्रचार करताना दिसत आहेत. या दोन्ही उमेदवारांना त्या त्या आंदोलनातील आंदोलक, गुंतवणुकदार कसे पाठिंबा देतात आणि त्यांच्या मतांचा इतरांवर कसा परिणाम होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
फोटो आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sagar investment and badlapur sexual assault case agitators shailesh vadnere sangita chendwankar contesting election from murbad assembly constituency asj