साई गणेश धाम सहकारी गृहसंस्था, विजयनगर, कल्याण पूर्व
कल्याण पूर्व हा उंचसखल टेकडीचा, अनेक वर्ष नागरी सुविधांपासून वंचित असलेला परिसर आहे. पालिकेकडूनही सुविधा देण्याच्या दृष्टीने हा भाग दुर्लक्षित होता. गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून मात्र कल्याण पूर्वेतील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मोकळ्या, चाळींच्या जागांवर टोलेजंग इमारती उभ्या राहू लागल्या. त्याचबरोबर परिसरातील दलदलीच्या जागांवर धनदांडग्या विकासकांची गृहसंकुले आकाराला येऊ लागली. तशी या भागात रस्ते, पदपथ, पथदिवे व इतर नागरी सुविधा उपलब्ध होऊ लागल्या. अशाच संकुलांमध्ये विजयनगरमध्ये टेकडीच्या पायथ्यावर एक नेटनेटके, आखीव रेखीव रस्त्यांच्या मध्यभागी ‘साई गणेश धाम’ गृहसंकुल उभे आहे. पन्नास वर्षांपूर्वी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्त्याखाली नगररचना विभागाने कल्याण पूर्वमधील विजयनगर भागाचा आखीव रेखीव आराखडा जाहीर केला. या आराखडय़ातील काही भूखंड (प्लॉट) विक्रीला काढले. असेच तीन भूखंड एकत्रीत करुन, ते एका विकासकाने खरेदी केले. हा भूखंड जिल्हाधिकाऱ्यांच्या आराखडय़ातील असल्याने, त्यात कोणी कोपरे मारुन टपरी, हातभर जागा ढापण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळे या भूखंडाचा पुरेपूर वापर करुन विकासक मनोज राय यांनी टेकडीच्या उताराचा भाग असुनही या आराखडय़ातील भूखंडावर देखणी चार माळ्याची इमारत २००२ मध्ये उभी केली. चार माळ्याच्या या इमारतीला दोन पाखा (विंग) आहेत. तीन प्रवेशद्वार आहेत. त्यावेळी आताच्या इतके घरांचे भाव गगनाला भिडलेले नसल्याने मध्यमवर्गीय नोकरदारांना येथे घरे घेतली. विविध जाती, धर्मातील कुटुंब या इमारतीत राहण्यास आली. या इमारतीचा आणखी एक फायदा झाला, तो म्हणजे या इमारतीत कल्याण पूर्वेत अन्यत्र राहणारे, बँकेत उच्चपदावर कार्यरत असणारे अरविंद गायकवाड हे सद्गृहस्थ या इमारतीत एक कुटुंब म्हणून राहण्यास आले. बँकेत पै आणि पैचा हिशेब ठेवण्याची सवय, काटेकोर, कडक शिस्तीचे पालन व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनात करण्याचा संस्कार असल्याने गायकवाड यांनी सुरुवातीला इमारतीत राहण्यास आलेल्या सर्वच रहिवाशांचा अंदाज घेतला. इमारतीत तर राहण्यास आलो आहोत. आता त्याचा कारभार सोसायटी म्हणून सुरू केला पाहिेजे, हे अरविंद गायकवाड यांनी इमारतीमधील आपल्या समवयस्क रहिवाशांना सांगण्यास सुरुवात केली. त्यांनी पुढाकार घेऊन सोसायटी नोंदणीकृत करुन, त्याचे मानीव अभिहस्तांतरण (डिम्ड कन्व्हेअन्स) तातडीने का केले पाहिजे, हे रहिवाशांना पटवून दिले. सदनिका नावावर असली तरी, त्या इमारती खालची जमीनही रहिवाशांच्या नावावर असली पाहिजे, हा विचार पंधरा वर्षांपूर्वी गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी रहिवाशांवर बिंबवला. एखादी इमारत उभी राहिल्यानंतर त्याचे नोंदणीकरण अनेक वेळा सोसायटी सदस्यांचा निष्काळजीपणा, विकासकांच्या दुर्लक्षामुळे वर्षांनुवर्ष रखडते. अभिहस्तांतरण (कन्व्हेअन्स) विषय आताही अनेक सोसायटय़ांना माहिती नाही. गेल्या पाच वर्षांपासून अभिहस्तांतरण करुन घेण्यासाठी सोसायटय़ा धडपडू लागल्या आहेत. अशी ही सगळी गोंधळाची परिस्थिती नव्याने इमारतीत राहण्यास येणाऱ्या सदस्यांची असते.
पर्जन्य जलसंचयन
सोसायटीच्या निधीची उधळपट्टी होऊ नये म्हणून एकदाच मंडप, ध्वनीक्षेपणाचे साहित्य खरेदी करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी लागणारे भांडी, वाढपीचे साहित्य सोसायटीच्या ठेव्यात आहे. सोसायटीचे स्वतंत्र कार्यालय आहे. आठवडय़ात व रविवारी कार्यालय उघडे असते. येणाऱ्या काळात सोसायटीच्या मलनि:स्सारण वाहिनीची कोणतीही समस्या उदभवू नये म्हणून सहा लाख खर्च करुन मलनि:स्सारण योजना पूर्ण करण्यात आली आहे. राखीव पाण्यासाठी कुपनलिकेचा वापर केला जातो. पाणी मुरविण्यासाठी जलसंचय योजना (रेन वॉटर हार्वेस्टिंग) साई गणेश धाम सोसायटीत करण्यात आली आहे. आपण बांधलेल्या वास्तुची चांगली देखभाल आणि तिचे अस्तित्व आहे तसेच ठेवण्यासाठी होणारे प्रयत्न पाहून सोसायटीच्या रस्त्यावरुन नियमित येजा करणारा या सोसायटीचा विकासक मनोज राय सोसायटीसाठी नेहमीच सहाय्य करण्यासाठी सज्ज असतो. सोसायटीत नव्याने महानगर गॅसची वाहिनी
टाकण्यात आली आहे. लवकरच सोसायटीला गॅसद्वारे पुरवठा सुरु होईल. सोसायटी स्वच्छ त्याचबरोबर परिसर स्वच्छ असला पाहिजे म्हणून सोसायटीबाहेरील रस्त्यावर कचरा, भंगार काही असेल तर पालिकेला, पोलिसांना तात्काळ कळविले जाते. सुरुवातीच्या काळात सोसायटीची घडी बसेपर्यंत बँकर अरविंद गायकवाड यांनी झोकून सोसायटीसाठी काम केले. आताही अन्य सदस्यांबरोबर सक्रिय आहेतच. सोसायटीच्या कामाचा अनुभव प्रत्येक सदस्याला आला पाहिजे, म्हणून त्याप्रमाणे अन्य सदस्यांना नवीन कार्यकारिणीत स्थान दिले जाते. सोसायटीचे अध्यक्ष प्रभाकर पवार, सचिव गजानन शिंदे, खजीनदार गजानन खोल्लम, यांसह अरविंद गायकवाड, कमलाकर सुरवडे, विष्णु देशमुख, प्रकाश जगताप यांची कार्यकारिणी सध्या सोसायटीचे कामकाज पाहते. ज्येष्ठ म्हणून प्रत्येक कामकाजात गायकवाड यांचे मार्गदर्शन घेतले जाते. गायकवाड यांचे चौफर वाचन आहे. त्यात त्यांचे स्वत:चे ग्रंथालय आहे. या ग्रंथालयात सोसायटी, सहकार कायदे, पालिकेची महाराष्ट्र प्रांतिक अधिनिमयाची सगळी पुस्तके पाहण्यास मिळतात. आपल्याबरोबर सोसायटीही कोणत्याही बाबतीत मागे राहू नये, हा या संग्रहामागील उद्देश आहे.
सोसायटीच्या आर्थिक कारभारात प्रत्येक पैशाचा हिशेब ठेवला जातो. दर रविवारी सगळे सदस्य कार्यालयात एकत्र येतात. साई गणेश धाममधील नवीन उपक्रमाविषयी चर्चा करतात. नवीन सहकार कायदे याची माहिती सदस्यांना दिली जाते. पालिकेच्या कायद्यांवर चर्चा केली जाते. वेळोवेळी नवीन येणाऱ्या सहकार कायद्यानुसार सोसायटीचा कारभार चालवा याची दक्षता घेतली जाते. वर्षांतून सहा ते सात वेळा विशेष सर्वसाधारण सभा घेऊन सोसायटीच्या कारभार, आर्थिक परिस्थिती, नवीन सुधारणा याविषयी चर्चा केली जाते. सर्व सदस्यांना सहकार कायद्याकडून येणाऱ्या नवीन उपविधी (बायलॉज) या विषयीची माहिती देण्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला जातो. केवळ आपलीच सोसायटी नव्हे तर, प्रत्येक सोसायटीने कायद्याच्या चौकटीत राहून शिस्तीने कारभार केला पाहिजे, यासाठी स्वत: अरविंद गायकवाड अन्य संस्थांमध्ये जाऊन मार्गदर्शन शिबीरे घेतात. अस हे सोसायटीत कस शिस्तीने, कायद्याच्या चौकटीत रहावे याचे प्रशिक्षण देणारे साई गणेश धाम संकुल हे एक दर्जेदार ‘प्रशिक्षण, संस्कार संकुल’ आहे.

एक तपापूर्वीच अभिहस्तांतर
अशा परिस्थितीत पंधरा वर्षांपूर्वी विकासक मनोज राय यांनी उभारलेली इमारत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन रहिवाशांनी विकासकाकडून ताब्यात घेतली. साई गणेश धाम असे इमारतीचे नामकरण करण्यात आले. इमारत ताब्यात घेतल्यानंतर २००३ मध्ये रहिवाशांची सोसायटी स्थापन करण्यात आली. २००४ मध्ये साई गणेश धाम सहकारी गृहसंस्था या नावाने सोसायटी उपनिबंधकांकडे नोंदणीकृत (रजिस्टर्ड) करण्यात आली. २००४ मध्येच सहा महिन्याच्या आत साई गणेश धाम सोसायटीचे अभिहस्तांतरण (कन्व्हेअन्स डिड) विकासकाने दिलेल्या सहकार्यामुळे करुन घेण्यात आले. कल्याण पूर्वमधील अभिहस्तांतरण झालेली साई गणेश धाम ही पहिली सोसायटी. सोसायटीतील एक सदस्य ‘झालेच’ पाहिजे या आग्रही मताचा असेल, आणि त्या सदस्याला सर्व सदस्यांची एकमताने साथ असेल तर काय होऊ शकते, याचे साई गणेश धाम सोसायटी हे उत्तम उदाहरण आहे. सोसायटीत राहतो म्हणजे एक कुटुंब म्हणून आपण एकत्र राहिले पाहिजे. म्हणून सोसायटीत गणेशोत्सव, दिवाळी, होळी व इतर सण, उत्सव साजरे करण्यात येऊ लागले. सोसायटीची सार्वजनिक पूजा ठेऊन सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी हळदीकुंकु समारंभ करण्यात येऊ लागले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात सोसायटीत साजरी करण्यात येते. उत्सव काळात दोन दिवस बाबासाहेबांचा जय घोष सोसायटीत होत असतो. सोसायटी सदस्यांसह परिसरातील रहिवासी या उपक्रमात सहभागी होतात. सोसायटीत कोणताही सार्वजनिक कार्यक्रम करायचा असेल तर सोसायटी सदस्यांवर वर्गणीचे बंधन टाकले जात नाही. सदस्याच्या मनात असेल ती रक्कम जमा करुन, कार्यक्रम उत्साहाने साजरे केले जातात. डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाला अख्खी सोसायटी एकजीव होते. सोसायटीतील उत्सवांचा उत्साह पाहून बाहेरील मंडळी वर्गणी देण्यासाठी पुढे येतात. पण त्यास नम्रपणे नकार देऊन संबंधितांना कार्यक्रमात सहभागी करुन घेतले जाते. सोसायटीत राहणाऱ्या कोणत्याही सदस्यापासून आजुबाजुच्या सदस्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाते. सोसायटीत सीटीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दोन रखवालदार सोसायटीची सुरक्षा पाहतात. सोसायटीच्या चोहोबाजुने पारिजातक, तगर, उंच शोभीदार, झुडपीदार फुलांची झाडे आहेत. इमारतीच्या चोहोबाजुने फिरण्यास मोकळी जागा. दर्शनी भागात प्रशस्त मैदान. रहिवासी शतपावलीसाठी या जागेचा वापर करतात. तीन प्रवेशद्वारातून येजा करण्यास असलेली जागा. दुचाकी, चारचाकी वाहनतळांसाठी प्रशस्त जागा हे सोसायटीचे मुख्य वैशिष्टय आहे. सोसायटीच्या आवारात फेरीवालाच नाहीच, पण अनाहूत व्यक्तिला कोणाकडे आला आहात, याची सविस्तर माहिती दिल्याशिवाय, खात्री केल्याशिवाय सोसायटीत प्रवेश दिला जात नाही. सोसायटीचा कानाकोपरा दररोज स्वच्छ केला जातो. झाडलोट नियमित केली जाते. सोसायटी हे आपल घर आहे, असे समजून प्रत्येकाने कृती केली पाहिजे, असा अलिखीत नियम सोसायटीत पाळला जातो. सोसायटीत प्रवेश करतानाच सोसायटीत वावरताना वर्तन कसे करावे, याची नियमावली फलकावर देण्यात आली आहे. त्यामुळे सोसायटीच्या आवारात कोठे कागदाचा तुकडा किंवा वाळलेले पान पडलेले दिसत नाही. इतकी स्वच्छता आवारात ठेवली जाते.

Story img Loader