ठाणे : ठाणे शहरात मोठ्याप्रमाणात बांधकामे सुरू आहेत. या बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या कामागारांच्या नागरिकत्त्व तपासणी करा अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे पोलिसांकडे केली आहे. त्यांसदर्भाचे पत्र त्यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना दिले आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सैफ अली खान याच्यावर काही दिवसांपूर्वीच हल्ला झाला होता. या हल्ल्यातील आरोपीला घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेटमधील कांदळवनातून मुंबई आणि ठाणे पोलिसांच्या संयुक्त पथकाने रविवारी पहाटे ताब्यात घेतले. तो बांगलादेशी असल्याचे समोर आल्यानंतर आता ठाणे शहरात बेकायदेशीररित्या घुसखोरी केलेल्या बांगलादेशींचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के हे रविवारी दुपारी हिरानंदानी इस्टेट येथील घटनास्थळी गेले होते. त्यानंतर सोमवारी त्यांनी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना विकासकांकडे काम करणाऱ्यांची चौकशी करा अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. या पत्रात म्हटले आहे की, घटनास्थळी पाहणी केली असता, तिथे शेकडो झोपड्या बांधल्याचे दिसून आले. विकासकाच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या झोपड्यांमध्ये हे कामगार राहत असल्याची माहिती मिळाली आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची कोणत्याही प्रकारे चौकशी किंवा कोणतीही माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आलेली नाही.

हेही वाचा >>>भिवंडीत भररस्त्यात पोटात भोसकला चाकू; हल्ल्यानंतर जखमीला शिवीगाळ केल्याची विकृती मोबाईल चित्रीकरणात कैद, एकाला अटक

या कामगारांमध्ये बांगलादेशी असण्याची शक्यता असून तशी चर्चा ठाण्यात सुरू आहे. विकासकांनी कामगारांची चौकशी करून त्याची माहिती पोलीस ठाण्यात देणे गरजेचे असते. परंतु विकासक तसे करत नाहीत असे पत्रात म्हटले आहे. तसेच बांगलादेशी नागरिक काही दिवस कामाच्या बाहाण्याने अशा ठिकाणी राहतात. त्यानंतर शहर, जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी कारवाया सुरू करतात. त्याचबरोबर विकासकांनी बांधलेल्या अशा झोपड्यांमध्ये गुन्हेगारी जगतात वावरणारे अनेक आरोपी राहातात, अशी चर्चा आहे. त्यामुळे भविष्यात ठाणे शहराला धोका निर्माण होऊ शकतो. ठाण्यातील विकासकांनी आपल्याकडे राहत असलेल्या कामगारांची माहिती जर आपल्याला दिली नसेल. तर संबंधितांची योग्य चौकशी करून सदरची माहिती आपल्याकडे उपलब्ध करुन घेणे गरजेचे आहे व संबंधितांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई तातडीने व्हावी असेही पत्रात म्हटले आहे.

Story img Loader