कल्याण : अभिनेता सैफ अली खान यांच्यावर हल्ला करणाऱ्या संशयितांची धरपकड पोलिसांकडून सुरू होती. त्यावेळी छत्तीसगड येथे रेल्वेने प्रवास करत असताना रेल्वे सुरक्षा बळाने हल्ल्यातील संशयित म्हणून टिटवाळा येथील नांदप गावातील इंदिरानगर भागातील आकाश कनोजिया (३१) या तरूणाला अटक केली होती. या हल्ला प्रकरणाशी आपल्या मुलाचा कोणताही संबंध नसताना केवळ संशयित म्हणून पोलिसांनी त्याला पकडले. याचा जबर मानसिक धक्का आकाश यांना बसला आहे. ते मनोरुग्णासारखे वागत आहेत, अशी माहिती आकाशच्या कुटुंबीयांनी माध्यमांना दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता सैफ अली खान यांच्यावर मुंबईत त्यांच्या राहत्या घरी एका इसमाने हल्ला केला. या हल्ल्यानंतर सदर इसम पळूुन गेला. सैफ अली खान यांच्या घरातील आणि रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये हल्लेखोर कैद झाला होता. या हल्लेखोऱ्याच्या चेहऱ्याशी साधर्म्य असलेल्या संशयित व्यक्तिंची पोलिसांनी विविध भागातून धरपकड सुरू केली होती. एकूण ३५ पोलीस पथके या हल्ला प्रकरणातील हल्लेखोर पकडण्यासाठी काम करत होती.

टिटवाळा जवळील नांदप गावातील इंदिरानगरमध्ये आकाश कनोजिया हा आपल्या आई, वडिलांसह राहतो. मुंबईत अभिनेता सैफ खान यांच्यावर हल्ला झाला. त्यावेळी आकाश कनोजिया हे मुंबईतून रेल्वेने छत्तीसगडच्या दिशेने आपल्या मूळ गावी जाण्यासाठी प्रवास करत होते. त्यांना अशा काही घटनेची माहितीही नव्हती. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमधून हल्लेखोर पळून गेला असण्याचा संशय व्यक्त करून रेल्वे सुरक्षा बळाने मेल, एक्सप्रेसमध्ये हल्लेखोराच्या चेहऱ्याशी साधर्म्य असलेल्या प्रवाशांची चौकशी, त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती. रेल्वे प्रवासात असताना रेल्वे पोलिसांनी हल्ल्याचा आकाशवर संंशय घेऊन त्याला दुर्ग रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत सैफ खानचा संशयित हल्लेखोर म्हणून पोलिसांनी आकाशला ताब्यात घेतले. आपला या प्रकरणाशी काही संबंध नाही, असे आकाश यांनी पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी काहीही न ऐकताच, कसलीही खातरजमा न करता आपल्या मुलाला ताब्यात घेतले. त्याची छायाचित्र प्रसिध्द झाली. या सगळ्या प्रकारामुळे आम्हाला कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला. आकाश या धक्क्यातून सावरलेला नाही. तो मनोरुग्ण असल्या सारखे वागतो. माझ्या मुलासोबत जे घडले ते चुकीचे होते, अशी माहिती आकाशच्या वडिलांनी माध्यमांना दिली. आकाशची झालेली बदनामी कधीही न भरून येणारी आहे. त्याचे नाव पोलीस दप्तरी आल्याने त्याला आता नोकरी कोण देणार असे प्रश्न आकाशच्या वडिलांनी उपस्थित केले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saif ali khan attack case mental health of titwala suspect deteriorated said by family asj