ठाणे : आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि स्थलांतरित कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि त्यांना मूलभूत कौशल्ये विकसित करता यावीत, यासाठी कल्याणमधील सजिता नांबिसन या २०१६ पासून कार्यरत आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम, कौशल्ये विकास कार्यशाळा त्या घेत असून विद्यार्थ्यांसह पालकांनाही शिक्षणप्रक्रियेत सक्रिय सहभागी करून घेण्याचा प्रयत्न त्या करित आहेत.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित कुटुंबे वास्तव्यास आहेत. या कुटुंबांतील दैनंदिन जीवन पाहता व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित केले जात असल्याचे दिसते. या कुटुंबातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाची वाट धरण्यास अनेक अडथळे येतात. त्यामुळे अनेक मुले मूलभूत वाचन, लेखन आणि संख्याज्ञान कौशल्ये आत्मसात करू शकत नाहीत.

या समस्येवर काहीतरी उपाय हवा यासाठी सजिता यांनी २०१६ साली आपल्या पतीसमवेत ‘सजग’ स्स्थापना केली. २०१६ मध्ये केवळ २५ विद्यार्थ्यांसोबत या उपक्रमाची सुरूवात झाली. यावेळी, ‘तुमच्या वर्गात आल्यापासून मी हुशार झालो,’ असे विद्यार्थी सांगू लागल्यावर या उपक्रमाची खरी गरज प्रामुख्याने असल्याचे त्यांना जाणवले. सजिता या संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचा पाया भक्कम व्हावा, यासाठी विद्यासदन उपक्रम राबवतात. यात स्थलांतरित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना समाविष्ट करून घेतले आहे. शालेय अभ्यासक्रमाशी पूरक मदत मिळावी, वाचन, लेखन आणि संवाद कौशल्ये आत्मसात करता यावीत, यासाठी हा उपक्रम दररोज वस्त्यांमध्ये राबवला जातो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसोबतच पालक आणि शिक्षकांनीही दर्जेदार साहित्य वाचावे, यासाठी एनरीड लायब्ररी देखिल सुरू करण्यात आली. या उपक्रमामुळे मुलांना वाचनाची गोडी लागली आणि पालकही या प्रक्रियेत सहभागी होत असल्याचे त्यांच्यावतीने सांगण्यात आले.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाच शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविला जात आहे. यामध्ये अध्यापन प्रक्रियेत सुधारणा करून विद्यार्थ्यांना शिक्षण अधिक आकर्षक आणि परिणामकारक करण्यावर भर दिला जातो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षणाची ओढ लागावी यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात खेळ, नाटक आणि कलांच्या माध्यमातून शिक्षण देण्याची पद्धत सुरू करण्यात आली. हा उपक्रम शिकण्याचा एक प्रभावी मार्ग झाला. त्यामुळेच सजगच्या अभ्यासवर्गाचा नाट्य, कला आणि खेळ हा अविभाज्य भाग आहे.
प्रतिक्रिया

२०१६ मध्ये २५ मुलांचा वर्ग घेऊन हा उपक्रम सुरू केला. गरजू विद्यार्थ्यांना शिकवत राहणे, त्यांना त्यांच्या पायावर उभा राहता येईल तोंपर्यंत पाठबळ करायचं हा विचार होता. ‘तुमच्या वर्गात आल्यापासून मी हुशार झालो’ असे म्हणणाऱ्या विद्यार्थ्याचा ऐकून वेदना वाटते. कारण, समाजाने या विद्यार्थ्यांना आतापर्यंत कमी पणाची जाणीव करून दिली आहे. मात्र, या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांचा आदर, प्रेम पालकांना जाणवले आणि हळू हळू सजग हा उपक्रम जास्त लोकांपर्यंत पोहोचला.