ठाणे : राज्याच्या विविध भागात वेगवेगळ्या प्रथेप्रमाणे होळी उत्सव साजरी करण्याची परंपरा असतानाच, ठाणे शहरात गेल्या शंभर वर्षांपासून ‘साखरपुड्याची होळी` साजरी केली जात आहे. होळीच्या पंधरा दिवस आधीपासून नागरिकांचे संघ तयार करून परिसरात पारंपारिक पोशाखात मिरवणुका काढतात आणि या मिरवणुकांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतात. यंदाच्या वर्षी महिला अत्याचार आणि सुरक्षा या विषयावर सामाजिक संदेश देण्यात येत आहे.

ठाणे महापालिका अस्तित्वात येण्यापुर्वी ठाण्यात अनेक गावे होती. पालिकेच्या स्थानपनेनंतर या गावांना शहरी रुप प्राप्त झाले. गेल्या काही वर्षात शहराचे मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले. असे असले तरी, येथील स्थानिक नागरिकांनी सण, उत्सवांतील आपल्या प्रथा परंपरा आजही टिकवून ठेवल्याचे चित्र दिसून येत आहे. ठाणे शहरातील बाळकुम गावात गेल्या शंभर वर्षांपासून ‘साखरपुड्याची होळी` साजरी केली जात आहे. १५ दिवस आधीपासून पारंपारिक पद्धतीने हा उत्सव साजरा केला जात आहे. यंदाच्या वर्षीही या उत्सवाची परंपरा कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे.

‘साखरपुड्याची होळी` म्हणजे काय ?

होळी उत्सवाच्या दोन आठवड्या पुर्वीच परिसरातील प्रत्येक भागात मिरवणुक काढली जाते. गावी पारंपारिक पद्धतीने विवाह आणि साखरपुडा साजरा केला जातो. त्याच पद्धतीने या मिरवणुकीमध्ये साखरपुडा साजरा केला जातो. होळीच्या काही दिवस आधी साखपुड्यासाठी लागणारे साहित्य एका लाकडी टोपलीमध्ये ठेवुन त्याची मिरवणुक काढली जाते. यासाठी नागरिकांचे संघ तयार केले जातात आणि या प्रत्येक संघात वधु आणि वर वेशभुषा केलेले कलाकार सहभागी होतात. त्यांची वाजत – गाजत मिरवणुक काढली जाते. तसेच या मिरवणुकीदरम्यान सामाजिक संदेश दिला जातो. यामुळे या होळीला ‘साखरपुड्याची होळी` म्हटले जाते, असे स्थानिक परेश पाटील यांनी सांगितले.

यंदाही उत्सवाची परंपरा कायम

‘साखरपुड्याची होळी` उत्सवात बाळकुम गावातील रहिवासी पारंपारिक पोशाखात तर काही विविध वेशभूषा करून सहभागी होतात. या उत्सवात अनेकजण पारंपरिक नृत्यही करतात. यंदाही परंपरा कायम असून यंदा ९ ते १० संघ तयार करण्यात आले होते. या संघांनी आपल्या परिसरात मिरवणुकीचे आयोजन केले होते. बाळकुम पाडा नं. १, २, ३, साईबाबा महिला मंडळ, भोईर आळी, जोशी आळी महिला मंडळ, सोनू आई मंडळ अशी नावे संघांना देण्यात आली होती. यंदा महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च रोजी एका भागात मिरवणुक काढण्यात आली होती. त्यात महिला फेटे परिधान करून सहभागी झाल्या होत्या, अशी माहिती विजय पाटील यांनी दिली.

यापुर्वीच्या मिरवणुक अशी झाली

मिरवणुकीमध्ये विविध वेशभुषा केल्या जातात. करोना काळात पीपी किटमध्ये रुग्ण सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांची वेशभुषा करण्यात आली होती. सरकार, भूत, नवरा-बायको, रावण, जोकर, कडक लक्ष्मी, कोळी, अस्वल अशा विविध प्रकारची वेशभुषा करण्यात आली होती. तसेच काही भागात काढल्या जाणाऱ्या मिरवणुकीत घोडा, बैल यांचा देखील समावेश केला जातो. तसेच वधु व वराच्या वेशभुषेत असलेल्या जोडप्याची घोड्यावरून मिरवणुक काढली जाते. अखेर होळीच्या दिवशी येथील ठाणे महानगर पालिकेच्या शाळेजवळ एक गाव एक होळी अशी मोठी होळी साजरी केली जाते.

Story img Loader