कल्याण पूर्वेतील विजयनगर भागात राहत असलेल्या एका विकासकाने आडिवली-ढोकळी गावातील एका इमारती मधील एक सदनिका वेगळ्या वेळेत चार जणांना विकून खरेदीदारांची आर्थिक फसवणूक केली आहे. अशा प्रकरणात एका ग्राहकाची आठ लाख ३६ हजार रुपयांची फसवणूक झाल्याने त्याने मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.
विकास व्यंकटस्वामी पवार (४०, रा. कृष्णा सोसायटी, सेंट थाॅमस शाळे जवळ, विजयनगर, कल्याण पूर्व) असे आरोपी विकासकाचे नाव आहे. त्यांच्या विरुध्द प्रवीण अशोक सावंत (रा. रामचंद्र सोसायटी, तिसगाव नाका, कल्याण पूर्व) यांनी तक्रार केली आहे. सप्टेंबर २०१४ ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत श्री नामदेव सदन इमारत, आडिवली-ढोकळी येथे हा प्रकार घडला आहे.
पोलिसांनी सांगितले, विकासक विकास पवार यांनी आडिवली ढोकळी येथील श्री नामदेव सदन मधील बी पाख्यातील सदनिका क्रमांक १०४ ही जमीन मालक श्रीराम पवार यांना उल्हासनगर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करुन दोन वर्षापूर्वी विकली आहे. हा व्यवहार पूर्ण झाला असताना विकासक पवार यांनी आपणास श्री नामदेव सदन मधील खोलीची विक्री करायची असे सांगून तिसगाव येथील रहिवासी प्रवीण सावंत यांना श्रीराम यांना विकलेल्या खोलीची आठ लाख ३६ हजार रुपयांना पुन्हा विक्री केली. अशाच प्रकारची फसवणूक विकास पवार यांनी अखिलेश पटेल, संतोष शिंदे यांची केली आहे, असे सावंत यांच्या निदर्शनास आले.
सदनिका खरेदी नंतर जेव्हा चार खरेदीदार सदनिकेवर आपला हक्क सांगून तेथे निवास व इतर व्यवस्था करू लागले. तेव्हा प्रत्येक जण एकमेकाला हरकत घेऊ लागला. प्रत्येक जण सदनिका आपल्या मालकीची आहे असे सांगू लागला. या चारही जणांना विकासक पवार यांनीच आपली फसवणूक केली आहे असे लक्षात आले. त्यावेळी प्रवीण सावंत यांनी विकासक पवार यांच्या विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आडिवली ढोकळी येथे अनेक बेकायदा इमारती बांधण्यात आल्या आहेत. या इमारतींमधील सदनिका भूमाफिया १० ते १५ लाख रुपयांना नोटरी पेपरवर खरेदीदारांना विकत आहेत. स्वस्तात घर मिळत असल्याने मुंबई परिसरातील झोपडपट्टी, चाळी भागातील रहिवासी याठिकाणी घर खरेदीसाठी येत आहेत.