ठाणे : वाहनात वापरल्या जाणाऱ्या ब्रँडच्या तेलाचे बनावटीकरण करून त्या तेलाची विक्री करण्यात आल्याचा प्रकार भिवंडीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांविरोधात निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ६२० तेलाच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
भिवंडी भागात ब्रँडच्या तेलाचे बनावटीकरण करून त्या तेलाची विक्री केली जात असल्याची माहिती वाहन तेल विक्री करणाऱ्या कंपनीला मिळाली होती. याबाबत त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भिवंडी पोलिस उपायुक्त कार्यालयास माहिती दिली होती. याप्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला होता. या तपासादरम्यान एकजण भिवंडी येथील एसटी थांब्याजवळ तेल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार निजामपूरा पोलिसांच्या पथकाने सापळा रचून एकाला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे तेलाच्या बाटल्या भरलेले चार खोके आढळून आले. त्याने हे तेल भिवंडी येथील नागाव भागातील एका गोदामातून घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
हेही वाचा – डोंबिवलीत काँक्रीट रस्ते कामांच्या ठिकाणी वाहतूक सेवकांची फौज
u
या माहितीनंतर पोलिसांच्या पथकाने नागाव भागात जाऊन गोदामात तपासणी केली. त्यावेळी पोलिसांना तेथे मोठ्याप्रमाणात बनावट तेल आढळून आले. पोलिसांनी ६२० तेलाच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.