ठाणे – देहविक्रय सारख्या व्यवसायाच्या दलदलीतून बाहेर पडून दिवाळी उत्सवाच्या वेळी मोठ्या संख्येने पणत्यांची विक्री करून स्वयंरोजगाराची प्रकाशमय वाट भिवंडी येथील हनुमान टेकडी परिसरात देहविक्री करणाऱ्या महिलांनी धरली आहे. गेल्या काही वर्षांपासून या महिला दिवाळी उत्सवाच्या काळात काही हजार पणत्यांची विक्री करून उत्तम अर्थार्जन करत आहेत. यंदाही या महिलांनी पाच ते सहा हजार पणत्यांची सजावट करून त्याची विक्री केली आहे. तर या अभिनव उपक्रमात श्रीसाई सेवा या सामाजिक संस्थेचा मोलाचा वाटा आहे.
भिवंडी येथील हनुमान टेकडी परिसर रेड लाइट एरिया म्हणुन प्रचलित आहे. या परिसरात देहविक्री करणाऱ्या महिलांचे वास्तव्य आहे. या महिलांना देहविक्री व्यवसायातून बाहेर काढून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी श्रीसाई सेवा संस्था आणि त्यांच्या संस्थापक डॉ. स्वाती सिंग या १५ वर्षांपासून कार्यरत आहे. या महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर व्हावे याकरिता जिल्हा बालविकास विभागाबरोबरच संस्था विविध उपक्रम राबवित असतात. याच अंतर्गत दिवाळी सणानिमित्त या महिलांना काही वर्षांपुर्वी पणत्या सजावट करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. मागील सात वर्षांपासून या महिला आकर्षक पणती सजावट करतात. यंदाही पणत्या सजावटीचे काम करण्यात आले. या महिलांनी सुमारे पाच ते सहा हजार पणत्यांना आकर्षक रंगांनी रंगवून सुरेख सजावट केली आहे. नवरात्रीनंतर या कामास सुरूवात झाली. या पणत्या विविध आकारात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. विविध रंगसंगतीने त्यांना सजावण्यात आले. अगदी स्वस्त दरात या पणत्या विक्रीसाठी बाजारपेठांमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या पणत्या विक्री साठी सरकारी अधिकारी, संस्थेचे सभासद तसेच एका महाविद्यालयाच्या सहभाग होता.
हेही वाचा >>>“मताधिक्य द्या, कथोरे मंत्रिमंडळात दिसतील”, विनोद तावडेंचे सूचक विधान, किसन कथोरेंनी भरला अर्ज
भिवंडीतील हनुमान टेकडी परिसरात, सुमारे दहा ते पंधरा वर्षांपासून देहविक्री करणाऱ्या महिलांच्या पुनर्वसनासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेमार्फत महिलांच्या सर्व समस्यांवर काम केले जाते आणि त्यांना पुनर्वसनाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाते. जिल्हा महिला व बालविकास विभागासोबत मिळून या महिलांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवले जातात. महिलांना सॅनिटरी पॅड, सर्जिकल कॉटन, आणि डिस्पोजेबल प्लेट्स तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते, जेणेकरून त्या स्वावलंबी बनू शकतील. याशिवाय, संस्थेतर्फे त्यांच्या मुलांसाठी ‘डे केअर सेंटर’ देखील चालवले जाते.