ठाणे : आर्थिक गुन्हे शाखेने ठाण्यातील घंटाळी परिसरात एका गृहसंकुलातील चार सदनिकांवर चार वर्षांपूर्वी जप्तीची कारवाई केली होती. पोलिसांच्या संमतीशिवाय त्यांचा परस्पर विक्री व्यवहार केल्याप्रकरणी ठाणे महापालिकेच्या नौपाडा कोपरी प्रभाग समितीचे तत्कालीन साहाय्यक आयुक्त, संबंधित गृहसंकुलाचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष, आणि अन्य दोघांविरोधात शासनाच्या अधिपत्याखालील मालमत्तांचे नुकसान आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२०१८ मध्ये ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने एका गुन्ह्याच्या तपासानंतर बलराज मलिक आणि सुनील सलढाणा या दोन आरोपींना अटक केली होती. या कारवाईत आर्थिक गुन्हे शाखेने घंटाळी येथील सुरज प्रिमायसेस या गृहसंकुलातील दोन सदनिकांवर जप्ती आणली होती. तसेच, आरोपी सुनील सलढाणा याने त्याच संकुलात भाडेतत्त्वावर घेतलेल्या दोन सदनिकाही ताब्यात घेतल्या होत्या. यानंतर २०२० मध्ये संबंधित इमारतीचे पुनर्विकासाचे काम सुरू करण्यात आले. या दरम्यान सोयटीच्या माजी अध्यक्षांनी त्यांच्या मालकीच्या आणि पोलिसांनी संरक्षित केलेल्या दोन सदनिका परस्पर विकल्या.