व्यापारी मीठ खरेदी करण्यासाठी वसईत
पावसापासून मिठाचे रक्षण करण्यासाठी पावसाळ्याच्या सुरुवातीपासून झाकून ठेवलेले वसईतील मिठाचे ढिगारे आता खुले करण्यात आले आहेत. ऑक्टोबर महिना सुरू झाल्यामुळे मिठागरे खुली झाली असून अनेक व्यापारी मीठ खरेदी करण्यासाठी वसईमध्ये दाखल झाले आहेत. मात्र, अवेळी पडणाऱ्या पावसामुळे जेव्हा पाऊस नसतो तेव्हा या मीठागरांतून मीठाची वाहतूक केली जाते.
वसईत सध्या ऊन आणि पावसाचा खेळ सुरूच आहे. यामुळे सर्वाचे वेळापत्रक बदलले आहे. परंतु मीठ कामगारांच्या वेळापत्रकात बदल झालेला नसून ऑक्टोबर महिना आला की मिठागरे खुली होण्यास सुरवात होते. हीच सुरवात वसईत देखील झाली असून वसईतील मिठागरांमध्ये मीठ व्यापारी दाखल झाले आहेत. पावसाळ्याच्या काळात हे मीठ सर्वत्र गवताने झाकून ठेवले जाते. साधारण चार महिन्यानंतर म्हणजेच पाऊस गेल्यानंतर हे मीठ खुले करण्यात येते. सध्या वसईतील पावसाच्या लहरीपणामुळे सकाळच्या आणि दुपारच्या वेळी पाऊस नसेल तेव्हा मिठागरांतील मीठ गोणींमध्ये भरून गाडय़ांमध्ये भरले जात आहे. मिठाचे उत्पादन हे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या महिन्यामध्येच केले जाते. पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात मिठाची विक्री झाल्यानंतर पुन्हा मिठाचे उत्पादन घेण्यास सुरवात होते. त्यामुळे जर मीठ संकलित करण्याच्या प्रक्रियेस उशीर झाला तर पुढच्या वर्षी मीठ उत्पादन प्रक्रियेस उशिर होणार असल्याचे मीठ उत्पादन कामगारांनी सांगितले. त्यामुळे पाऊस जाण्याची वाट न बघता ऑक्टोबर महिना सुरु झाल्याने मीठ संकलित करण्यासाठी व्यापारी दाखल झाले आहेत.
पालघर जिल्ह्यतील वसई -डहाणू पट्टय़ात १५ हजार एकर जागेवर मिठाचे उत्पादन होते. यातील जागेची मालकी राज्यसरकार व केंद्रसरकारच्या मालकीत अर्धी विभागलेली असते. वसईतील स्थानिक भूमिपुत्र हे या मिठाचे उत्पन्न घेऊन आपली उपजीविका करत असतात. एकूण पाच हजाराच्या आसपास कुटुंबे या व्यवसायावर आपली उपजीविका करतात. वसई-विरार मधल्या १७०० एकर जागेवर नीट उत्पादन घेतले जाते. गेल्या काही वर्षांत मिठागर व्यावसायिकांना अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. इमारतीचे सांडपाणी, नाल्यातील सांडपाणी, रासायनिक सांडपाणी थेट खाडीत सोडले जाते. त्यामुळे मीठ आगारातील पाण्यावर परिणाम होऊन अपेक्षित मीठ घटू लागले असल्याचे राज्य मीठ उत्पादक संघाचे मदन किणी यांनी सांगितले.