अमरावती पोलीस आयुक्तालयातील खोलापुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या पार्वती खोलगडे या स्त्रीच्या नवऱ्याची त्या परिसरातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हत्या केली होती. पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. दरम्यानच्या काळात आरोपी जामिनावर सुटून त्याच परिसरात राहायला आले.  
पार्वतीचा लहान मुलगा संदीपच्या मनात आपल्या वडिलांच्या खुनाचा बदला घेण्याचा विचार घोळत होता. मध्य प्रदेशातून त्यांच्या घरी राहायला आलेला संदीपचा मावसभाऊ वसंत, संदीप व पार्वती यांनी मुख्य आरोपी रवी रामचंद्र वानखेडे याच्या हत्येचा कट रचला. वसंत परत बऱ्हाणपुऱ्याला गेला आणि खांडवा येथील गुन्हेगार मित्र मुकेश पटेल याला हत्येची सुपारी दिली. त्याने त्याच्या मित्रांना सोबत घेतले. या कामासाठी ५० हजार रुपये मागितले. परंतु पार्वतीची बिकट परिस्थिती पाहता ते काम ३० हजार रुपयांत करण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे पटेल आणि त्याच्या मित्रांना संदीपने वानखेडेची ओळख पटवून दिली. पहिल्या दिवशी प्रयत्न फसला. दुसऱ्या दिवशीही ओळख नीट न पटल्याने रस्त्याची चौकशी करून मारेकऱ्यांनी रवीला सोडून दिले. मुकेशच्या गँगकडून तीच चूक होऊ नये म्हणून वडिलांचा बदला घेण्याच्या ईष्र्येने पेटून उठलेला संदीप त्यांच्या गँगमध्ये सहभागी झाला आणि ११ जानेवारी २०११ रोजी रात्री १०.३०च्या सुमारास रवी आपल्या बहिणीच्या घरून जेवण करून परतत असताना पटेल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्यावर गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या आणि ते पसार झाले.  
जखमी अवस्थेत रवीला पादचाऱ्याने रुग्णालयात दाखल केले. शुद्धीवर आल्यावर त्याने संदीप आणि अनोळखी व्यक्तीविरुद्ध फिर्याद दिली. खोलापुरी पोलीस ठाण्यात तपास सुरू होता. प्रथम संदीपला पोलीस स्थानकात बोलावण्यात आले पण १५ वर्षांचा हा मुलगा हे काम करू शकेल यावर पोलिसांना विश्वास बसला नाही. तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेला समांतर तपास करण्याचे आदेश दिले. संदीप आणि त्याचा मावसभाऊ वसंत यांच्यात भ्रमणध्वनीवर वारंवार संभाषण झाल्याचे आढळले. गुन्ह्य़ाची पाळेमुळे बऱ्हाणपूर येथे असण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक संजय चौगुले यांचे पथक मध्य प्रदेशला रवाना झाले. तेथे संदीपचा मावसभाऊ वसंत व त्याच्या दोन मित्रांना ताब्यात घेतले. त्यापैकी एकाने गुन्ह्य़ाची कबुली दिली. गुन्हय़ात वापरलेले पिस्तूलही सादर केले. आरोपींना घेऊन पोलीस अमरावतीला येताना प्रवासादरम्यान चौगुले यांना तो भ्रमणध्वनी क्रमांक महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्हय़ातील मलकापूर येथे सुरू असल्याचे कळले. त्यांनी आरोपीकडे चौकशी केली, पण माहिती मिळाली नाही. चौगुले भ्रमणध्वनीधारकाचा पत्ता शोधण्यासाठी शेगावला रवाना झाले. तेथून भ्रमणध्वनीचे लोकेशन शोधून काढून ते मलकापूरला पोहोचले. तो भ्रमणध्वनी ‘प्रीपेड’ होता. प्रयत्नांची शिकस्त करून चौगुले यांनी भ्रमणध्वनीधारकाला ओळखणाऱ्या एका व्यक्तीच्या मदतीने सापळा रचला.
गुन्ह्य़ातील मुख्य आरोपी मुकेश पटेल याला शरण येण्याचे आवाहन करूनही त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. चौगुले यांनीही प्रत्त्युतरादाखल गोळय़ा झाडल्या. पटेलकडून झाडण्यात आलेली गोळी थेट चौगुले यांच्या पोटात लागली. त्याही परिस्थितीत त्यांनी आरोपीला पकडले, पण त्यासाठी त्यांना प्राण गमवावे लागले. पटेल हा एका आंतरराज्यीय टोळीचा सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरुद्ध अमरावती येथे खोलापुरी गेट, राजापेठ, फ्रेजरपुरा, मध्य प्रदेशातील िनबोला, सिटी कोतवाली, बऱ्हाणपूर, कोतवाली खंडवा, पंधाना खंडवा, गणपती नाका, मोगट रोट खंडवा शहर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. जिवाची पर्वा न करता आरोपीला अटक करणाऱ्या चौगुले यांना मरणोत्तर पोलीस शौर्यपदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. चौगुले यांची पत्नी विजयालक्ष्मी शौर्यपदक स्वीकारणार आहेत. चौगुले यांनी अमरावती येथे गाजलेल्या खंडेलवाल दरोडा खटल्याच्या तपासातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. ६ वर्षांच्या सेवेत ७५ बक्षिसे व ६० हजार रुपयांची रोख बक्षिसे त्यांना मिळाली.
(सदर दोन्ही खून खटले न्यायप्रविष्ट असल्याने काही नावे बदलली आहेत.)
 डॉ. रश्मी करंदीकर ,पोलीस उपायुक्त, ठाणे शहर वाहतूक शाखा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा