लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : कल्याण जवळील मोहने गाळेगाव भागातील एक समोसा विक्रेता सडलेल्या बटाट्यांपासून समोसे तयार करत आहे. समोसे तयार करण्यासाठी वापरण्यात येत असलेले सडलेले बटाटे एका खोलीत घाणीच्या जागेत ठेवण्यात आले आहेत. मनसेच्या गाळेगाव सिंहगड शाखेच्या मनसैनिकांना हा प्रकार समजताच त्यांनी समोसे विक्रेत्याच्या गोदामावर छापा टाकून घडला प्रकार उघडकीला आणला.

मनसे गाळेगाव सिंहगड प्रभाग क्रमांक १२ च्या मनसेसैनिकांनी उघडकीला आणलेला प्रकार दृश्यचित्रफितीच्या माध्यमातून समाज माध्यमांवर नागरिकांच्या जनजागृतीसाठी प्रसारित करण्यात आला आहे. मोहने गाळेगावमधील तरे मार्केट सुधीर किरणा स्टोअरच्या पाठीमागील बाजूस समोसा विक्रेत्याने एका बंदिस्त खोलीत घाणेरड्या जागेत सडलेले बटाटे आणून ठेवले आहेत. हे बटाटे खाण्याच्या पध्दतीचे नाहीत. या बटाट्यांना दुर्गंधी येत आहे. बाजारात हे बटाटे घाऊक विक्रेत्यांनी टाकून दिलेले असतात. हे बटाटे समोसे विक्रेते कमी दराने किंवा तेथील कचरा उचलायचा म्हणून तेथील बटाटे उचलतात आणि ते बटाटे आपल्या गोदामात आणून ठेवतात.

हे बटाटे उकळत्या पाण्यात उकळून काढले की त्यामधील कचरा, कुजलेलापणा निघून जातो. हे सडके बटाटे कुस्करुन समोसे विक्रेते सकाळ, संध्याकाळ राजरोसपणे ग्राहकांना सडक्या बटाट्यांपासून तयार केलेले समोसे विकत असल्याची माहिती मनसे सैनिकांनी नागरिकांना समाज माध्यमातून दिली आहे. असे सडके समोसे विकून समोसे विक्रेते नागरिकांच्या आरोग्य, जीविताशी खेळत आहेत. या सडक्या बटाट्याप्रकरणी गाळेगाव सिंहगड शाखेच्या मनसे सैनिकांनी समोसे विक्रेत्याला जाब विचारून पुन्हा असा प्रकार केला तर मनसे पध्दतीने दणका देण्याचा इशारा दिला आहे. बटाटे ठेवलेली जागा दुर्गंधी युक्त, तेलाचा सडा पडलेली आहे. घाणीचे पाणी समोसा तयार करण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे कार्यकर्त्यांना दिसून आले. हे पाणी अनेक दिवसांचे असण्याची शक्यता कार्यकर्त्यांनी वर्तवली.

मनसेच्या या शोध मोहिमेतून समोसा विक्रेत्यांची समोसा तयार करण्याची किळसवाणी पध्दती उघडकीला आली आहे. नागरिकांनी कुठल्याही समोसा हातगाडीवर समोसा खाण्यापूर्वी त्या समोसा विक्रेत्याचे समोशासाठी वापरण्यात येत असलेला बटाटा आणि इतर सामान ठेवण्याचे गोदाम कुठे आहे. समोशासाठी संबंधित समोसा विक्रेता खाण्याचे कोणते तेल वापरतो याची माहिती घेण्याचे आवाहन मनसे सैनिकांनी नागरिकांना केले आहे.

कल्याण डोंबिवली पालिकेच्या आरोग्य विभागाने या गंभीर विषयाची दखल घ्यावी आणि अशाप्रकारे सडक्या बटाट्यापासून समोसे तयार करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी मनसे सैनिकांनी केली आहे. तसेच, शहराच्या विविध भागात जे बटाटावडे, समोसे विक्रेते व्यवसाय करतात. त्यांची गोदामे तपासणीची मोहीम पालिकेने सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर ही मोहीम पालिकेने हाती घेण्याची नागरिकांची मागणी आहे.