निखिल अहिरे
जिल्ह्यातील खाडी आणि नदीपात्रातून अधिकृतपणे रेती उपसा करण्यासाठी जिल्हा रेती गट विभागातर्फे मागील वर्षभरापासून निविदा प्रकिया राबविण्यात येत आहे. मागील सहा महिन्यांपूर्वी जिल्हा रेती गट विभागातर्फे रेती लिलावाची निविदा काढण्यात आली होती. मात्र नेहमीप्रमाणे तिलाही व्यावसायिकांकडून शून्य प्रतिसाद मिळाला. यानंतर पावसाळ्यात निविदा प्रकिया बंद करून ऑक्टोबर महिन्याच्या एक तारखेला निविदा प्रकिया सुरु करण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. ऑक्टोबर महिना संपत आला असून याबाबतच्या कोणत्याही हालचाली जिल्हा प्रशासनाने अद्याप सुरु केल्या नाहीत. तर राज्य शासनाकडून निविदा प्रकिया थांबविण्याच्या तोंडी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यामुळे केवळ सोपस्कार म्हणून सुरु असलेली रेती लिलाव निविदा प्रक्रिया पुन्हा एकदा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
हेही वाचा >>>डोंबिवली: निळजे गावात तोतया पोलिसाकडून ज्येष्ठ नागरिकांची लूट
राज्य शासनाच्या नियमानुसार सागरी किनारपट्टी विनियमन क्षेत्रातून नौकानयन मार्ग सोपा व्हावा त्यात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जिल्ह्यातील नदी आणि खाडी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून त्याचा लिलाव करण्यात येतो. यासाठी जिल्हा रेती गट विभागातर्फे निविदा काढण्यात येतात. ठाणे जिल्ह्याला विस्तीर्ण असा खाडी आणि नदी किनारा लाभला आहे. या खाडी आणि नदीपात्रातून वाळू उपसा करण्यासाठी मागील वर्षभरापासून जिल्हा रेती गट विभागातर्फे निविदा प्रकिया राबविण्यात येत आहे. मात्र पैसे देऊन अधिकृतरीत्या उपसा करण्यात रस नसलेल्या व्यावसायिकांनी या निविदेकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला मोठ्या महसुलाला मुकावे लागत आहे. रेतीचे शासकीय दर कमी करुनही परिस्थिती बदलली नाही. असे असले तरीही ठाणे जिल्हा रेतीगट विभागातर्फे मागील वर्षभरापासून वेळोवेळी रेती लिलाव निविदा जाहीर करण्याचे सोपस्कार पार पाडले जात आहेत. एप्रिल आणि मे २०२२ मध्ये जिल्हा प्रशासनातर्फे शेवटची रेती लिलाव निविदा जाहीर करण्यात आली होती. त्याला देखिल शुन्य प्रतिसाद मिळाला. यानंतर पावसाळ्यामुळे निविदा प्रकिया थांबविण्यात आली. तर ऑक्टोबर महिन्याच्या एक तारखेला निविदा काढण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. ऑक्टोबर महिना संपत आला असून अद्यापही निविदा प्रकिया राबविण्याच्या हालचाली देखील सुरु करण्यात आलेल्या नाही. तर राज्य शासनाकडून रेती लिलाव निविदा थांबविण्याच्या तोंडी सूचना देण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.
हेही वाचा >>>कल्याण : राज्य-जिल्हा यंत्रणेत एकमत नसल्याने आदिवासी विकासाची ठक्कर बाप्पा योजना ठप्प
अनिश्चित काळासाठी बंद ?
गेली दोन वर्ष वगळता त्या आधीची दहा वर्ष जिल्ह्यातील खाडी आणि नदीपात्रातून शासकीय परवानगीने रेतीचा उपसा करून त्याचा लिलाव प्रक्रिया पर्यावरणाच्या मुद्द्यांवर बंद होती. या प्रकियेतून महसूल मिळेल या आशेने जिल्हा प्रशासनाकडून रेती लिलाव प्रकिया पुन्हा सुरु करण्यात आली होती. मात्र व्यावसायिकांनी या प्रक्रियेकडे सपशेल पाठ फिरविल्याने प्रशासनाच्या आशा फोल ठरल्या. ठाणे जिल्ह्यात रेती लिलाव प्रक्रिया थांबविण्याच्या तोंडी सूचना राज्य शासनाकडून अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याची माहिती अधिकारी सूत्रांनी दिली आहे. तर याबाबत नोव्हेंबर महिन्यात बैठक घेणार असून यावर निर्णय घेण्यात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. दर कमी करूनही प्रक्रियेला मिळणाऱ्या शून्य प्रतिसादामुळे तसेच निविदा जाहीर करण्यात विलंब होत असल्याने अधिकृत रेती लिलाव पुन्हा अनिश्चित काळासाठी बंद होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.