डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील कोपर खाडी भागात खासगी मालकीची जमीन उकरून वाळू उपसा करणारी एक बोट शनिवारी रात्री चिखलात अडकली होती. ही माहिती कोपर ग्रामस्थांना समजताच त्यांनी बोटीच्या दिशेने धाव घेतली. वाळू माफिया बोटीचा ताबा सोडून पळून गेले. रात्रभर या बोटीवर ग्रामस्थांनी पाळत ठेऊन रविवारी दुपारी महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बोट पेटून देण्यात आली. १२ लाख रुपये किमतीची सामग्री नष्ट केली.
कोपर भागाचे माजी नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी शनिवारी रात्री कोपरजवळ खाडीत अडकलेल्या बोटीच्या दिशेने जाऊन बोटीचा ताबा घेतला. तत्पूर्वीच वाळू माफिया पळून गेले होते. कोपर ग्रामस्थांनी रात्रभर या बोटीजवळ गस्त घातली. रविवारी सकाळी तहसीलदार जयराज देशमुख, नायब तहसीलदार सुषमा बांगर यांना माहिती दिली.
हेही वाचा – डोंबिवलीत कंपनी व्यवस्थापकावर हल्ला करणारे चार जण अटक
नायब तहसीलदार बांगर कोपर खाडी किनारी कारवाई पथकासह हजर झाल्या. महसूल अधिकाऱ्यांनी बोटीला चारही बाजूने वेल्डिंग यंत्राने छिद्र पाडून, वाळू उपसा यंत्रणेसह बोटीला आग लावली. ग्रामस्थांच्या धाडसामुळे प्रथमच वाळू माफियांची बोट पकडण्यात आली. कोपर खाडी किनारी ग्रामस्थांची सुमारे १०० एकर जमीन आहे. यामधील १६ एकरचा पट्टा वाळू माफियांनी रात्रीच्या वेळेत उपसा करून नष्ट केला आहे, अशी माहिती रमेश म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांना दिली. या भागात वाळू उपशासाठी येणाऱ्या माफियांच्या बोटी ग्रामस्थांनी पकडल्या तर त्यासाठी महसूल अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाईसाठी सहकार्य करावे, असे आवाहन म्हात्रे यांनी केले.
कोपर गावाजवळ खाडी भागात सतत वाळू उपसा करून माफियांनी रेल्वे मार्गाला धोका निर्माण केला आहे. सतत उपसा सुरू राहिला तर पावसाळ्यात खाडीचे पाणी कोपर गाव हद्दीत घुसणार, असे ग्रामस्थांनी सांगितले.