गणेशोत्सवात मुंब्रा, दिवा, कोपर परिसरात संगनमताने रेती उपसा
एकाच वेळी ७० ते ८० ट्रॉलर घेऊन मोठय़ा टोळक्यासह खाडीकिनाऱ्यावर दाखल व्हायचे आणि सक्शन पंपाच्या सहाय्याने रेती उपसा सुरू करून अवघ्या काही तासात पोबारा करायचा, असे प्रकार मुंब्रा, दिवा आणि कोपरच्या खाडीकिनारी वाढू लागले असून, रेतीमाफियांच्या या टोळधाडीमुळे तिवरांच्या जंगलांची बेसुमार कत्तल पुन्हा सुरू झाली आहे. ठाण्याच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांच्या आदेशामुळे गेल्या काही महिन्यांपासून विविध भागातील तहसीलदारांनी रेतीमाफियांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली होती. मात्र ही मोहीम म्हणजे नुसता देखावा असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. रविवारी तसेच सुट्टीच्या दिवशी मुंब्रा आणि दिवा खाडीकिनारी तिवरांची जंगले सपाट करण्यासाठी माफियांची यंत्रणा अतिशय योजनाबद्ध पद्धतीने काम करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
ठाणे आणि आसपासच्या परिसरातील खाडीकिनारी होणारा अवैध रेती उपसा आणि त्यानिमित्ताने होणारी तिवरांच्या झाडांची कत्तल नवी नाही. पूर्वी खाडीकिनारी जेमतेम आठ ते दहा ट्रॉलर अथवा ड्रेझर नजरेस पडायचे. गेल्या काही दिवसांपासून ही संख्या एकाच वेळी ७० पेक्षा अधिक ट्रॉलर बेकायदा रेती उपसा करत असल्याचे दिसून आले आहे. शासकीय यंत्रणेकडून सातत्याने कारवाई सुरू असल्याने मुंब्रा, दिवा, कोपर या भागात विखुरलेल्या अवस्थेत असलेले वाळूमाफिया आता संघटित होऊ लागले आहेत. अवघ्या काही तासांमध्ये हव्या तेवढय़ा वाळूचा उपसा करायचा आणि पोबारा करायचा, असे प्रकार वाढीस लागले आहेत. मुंब्य्रातील रेल्वे पुलालगतच्या परिसरामध्ये वाळूमाफियांचा जणू मेळा भरल्याचे चित्र शनिवारी आणि रविवारी दिसून आले. सोमवारी सकाळी खाडीकिनाऱ्यावरील खारफुटीमध्ये काही ट्रॉलर लपवून ठेवलेल्या अवस्थेत दिसून आले. गणपती आणि सुट्टीच्या काळात शासकीय अधिकाऱ्यांच्या सुट्टीमुळे या भागाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता ओळखून वाळूमाफियांनी ही धाड टाकल्याची शक्यता पर्यावरण कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. अनेक दिवस केवळ २० ते २५ ट्रॉलर असलेल्या भागांत ही संख्या दुप्पट, चौपट झाल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाळू उपशातून खारफुटीची कत्तल
मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या वाळू उपशामुळे खारफुटीला धोका निर्माण होत असून खारफुटीचा पाया भुसभुशीत होण्यास सुरुवात होते. त्यामुळे कोणत्याही भागामध्ये पाणी शिरून तेथील जलीय परिसंस्था नष्ट होण्यास सुरुवात होते, तर काही ठिकाणी गाळाची बेटे तयार होण्याची शक्यता आहे. एका ट्रेलरमधून शंभर ट्रक वाळू उपसली जात असून हे अत्यंत धोकादायक आहे, असे मत पर्यावरण दक्षता मंचाचे अध्यक्ष डॉ. प्रसाद कर्णिक यांनी व्यक्त केले.