प्रशासकीय अधिकाऱ्यांना धमकी किंवा लाच देऊन बेकायदा वाळू उपसा करणारे माफिया बोकाळत असतानाच वसईत अशा माफियांची दहशत आणि दरारा झुगारून एक महिला अधिकारी त्यांना टक्कर देत आहे. वसईच्या नायब तहसीलदार स्मिता गुरव यांनी बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात जोरदार मोहीम उघडली असून रात्री-अपरात्री छापे घालून स्मिता गुरव यांनी वाळूतस्करांचे कंबरडे मोडले आहे. गेल्या नऊ महिन्यांत त्यांनी तब्बल ११ कोटी रुपयांची रेती जप्त करून त्याचा लिलाव केला आणि तब्बल साडेतीन कोटी रुपयांच्या दंडाची वसुली केली.
वसईच्या पूर्व भागातील खाडीत मोठय़ा प्रमाणावर रेती उत्खनन होते. गेल्या दोन वर्षांपासून तेथे रेती उत्खननास बंदी होती. जुलैमध्ये अंशत: परवानगी मिळाली. परंतु त्याचा गैरफायदा घेत वाळूमाफियांनी बेसुमार उपसा सुरू केला. या पाश्र्वभूमीवर पदभार स्वीकारणाऱ्या स्मिता गुरव यांनी वाळूमाफियांविरोधात धडक कारवाई सुरू केली. अचानक छापे टाकायचे आणि रेतीचे चोरटे ट्रक अडवून कारवाई करण्याची योजना त्यांनी आखली. या मोहिमेला चांगले यश मिळू लागले असून गेल्या नऊ महिन्यांत त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तब्बल ११ कोटी ६० लाख ७९ हजार रुपयांची रेती जप्त करून त्याचा लिलाव केला. या वेळी त्यांनी ३४९ ट्रकचालकांवर कारवाई करून ३ कोटी ४५ लाख रुपयांचा दंडही वसूल केला.
तहसीलदार कार्यालयाच्या कारवाईमुळे रेती तस्कर धास्तावले आहेत. त्याचबरोबर दगड आणि मातीची तस्करी करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत अशा ५८ गाडय़ांवर कारवाई करण्यात आली असून मोठे दगड चोरून नेणाऱ्या ८१ गाडय़ांवरही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडूनही जवळपास १५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांनी १२ गुन्हे दाखल केले आहेत. मात्र गुन्हे दाखल झाले की अवघ्या ३० हजार रुपयांत ते न्यायालयातून सुटतात. पण दंडात्मक कारवाई केली तर ३ लाखांचा दंड होतो. त्यामुळे गुन्हे दाखल न करता दंडात्मक कारवाई करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा